राज ठाकरे 'ईडी' चौकशीला हजर राहणार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

लोकशाही मार्गाने ईडीची नोटीस आली आहे, त्याच लोकशाही मार्गाने मी तिच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्या ही प्रकारचा अनुचित प्रकार आणि शक्तिप्रदर्शन करू नये असा संदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांच्या मार्फत दिला आहे.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे 22 ऑगस्टला 'ईडी' कार्यालयात हजर राहणार आहेत. ईडीच्या नोटिसीला उत्तर देताना मी एकटाच ईडी कार्यालयात जाणार असून कुठल्याही पद्धतीचे शक्तिप्रदर्शन मनसे कार्यकर्त्यांनी करू नये असे आदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत.

लोकशाही मार्गाने ईडीची नोटीस आली आहे, त्याच लोकशाही मार्गाने मी तिच्या चौकशीला सामोरे जाणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कुठल्या ही प्रकारचा अनुचित प्रकार आणि शक्तिप्रदर्शन करू नये असा संदेश राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना आपल्या नेत्यांच्या मार्फत दिला आहे.

मुख्यमंत्र्यानी सांगितले म्हणून नाही तर राज ठाकरे यांना राजकीय आकलन जास्त आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी हा स्वतःहून निर्णय घेतला आहे असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. काही चूक केली नसेल तर राज ठाकरे यांना घाबरण्याचं काही कारण नाही. मात्र कार्यकर्त्यांनी काही धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला तर कारवाईचा इशारा ही मुख्यमंत्र्यांनी दिला होता.

कोहिनूर मिल आर्थिक व्यवहाराप्रकरणी 'ईडी'ने राज ठाकरेंना 22 ऑगस्टला चौकशीला बोलावले आहे. या चौकशीला राज ठाकरे उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मनसे नेत्यांनी आज बैठक बोलावून 22 ऑगस्टला 'ईडी' कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन करून शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी केली होती. मात्र चौकशीसाठी एकटेच जाण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray will attend ED inquiry tomorrow