गणेशोत्सवात महागाईचे ‘विघ्न’

गणेशोत्सव सजावट साहित्य महागले
गणेशोत्सव सजावट साहित्य महागले
Updated on

मुंबई : देशभर मंदीची ‘लाट’ असताना गणेशोत्सवालाही महागाईची झळ बसणार आहे. यंदा गणेशोत्सवाचा खर्च १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढला आहे. मूर्ती, आरास, प्रसाद आणि नैवेद्यही महागले आहे. कच्च्या मालाचे वाढलेले भाव, कारागीर आणि कामगारांची वाढलेली मजुरी, यामुळे हे दर वाढल्याचे व्यापारी सांगतात. त्यात वस्तू सेवा करानेही (जीएसटी) भर टाकल्याने घरगुती गणपतीसाठी किमान चार-पाच हजारांचा खर्च वाढेल, असे काहींनी सांगितले.
 
गणपतीच्या मूर्तींची १० ते २० टक्‍क्‍यांनी भाववाढ झाली आहे. मूर्तीसाठी लागणारे रंग, हिरे, पीओपी यावर जीएसटी लागत असल्याने आणि कारागिरांचे पगार वाढल्याने भाववाढ करावी लागते. मागील वर्षी १४ हजार ते २५ हजारांना विकली गेलेली मूर्ती यंदा १५ हजार ते २८ हजारांवर गेली आहे. शाडूच्या मूर्तीमागे गतवर्षीपेक्षा १५० ते २०० रुपये जास्त आकारले जात आहेत. 

चिवडा, लाडूने ‘लज्जत’ राखली
गणेशोत्सवानिमित्त चिवडा आणि लाडू खरेदीसाठी लालबागमधील चिवडा गल्लीत ग्राहकांची गर्दी होते. अनेक प्रकारचा चिवडा १८० रुपये किलो आहे. तसेच, केळा वेफर्स, कचोरी, भाकरवडी १८० ते २०० रुपये किलोने विकली जात आहे. यंदा चिवडा व लाडूच्या किमती वाढलेल्या नाहीत. गतवर्षीप्रमाणेच किमती आहेत, अशी माहिती चिवडा गल्लीतील प्रमोद खामकर यांनी दिली.

हे महागले...
पूजेचे साहित्य 
गणेशोत्सवासाठी धूप, अगरबत्ती, कापूस, वस्त्र, कापूर, वाती आदींची मोठी खरेदी केली जाते. गतवर्षी १०० रुपयांत २०० ग्रॅम मिळणारे धूप यंदा ११५ ते १२५ रुपयांनी विकले जात आहे. ३०० ते ३२० रुपयांना पाव किलो मिळणारा कापूर ३५० रुपयांवर गेला आहे. कापसाची किंमतही ५ ते १० रुपयांनी वाढली आहे. कापसाच्या २० फूलवाती ६० रुपये, १०० फूलवाती २८० रुपये, २० सरळ वाती १० ते २० रुपयांना विकल्या जात आहेत. कापसाच्या वस्त्रांचेही भाव १० ते २० रुपयांनी वाढले आहेत. साधी अगरबत्ती ३६ ते ४० रुपये पाव किलो, तर मसाला अगरबत्ती २०० ग्रॅम १२५ रुपयांना उपलब्ध आहे. अगरबत्तीच्या किमती १० ते २० रुपयांनी वाढल्या आहेत.

गणपतीचे दागिने
गणपतीसाठी लागणाऱ्या खड्यांच्या व मोत्यांच्या दागिनांच्या किमती ३० ते ४० रुपयांनी वाढल्या आहेत. बाजारात नवे प्रकार आले की किमती वाढतात, असे दुकानदारांनी सांगितले. मोत्याची छोटी कंठी ५० ते ६० रुपयांऐवजी आता ८० रुपयांना विकली जात आहे. इतर मोत्यांच्या कंठीमध्ये २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे. 

मखर
थर्माकोलच्या मखरांवर बंदी घातल्याने विक्रेत्यांनी प्लायवूड, लाकूड, सनबोर्डचे मखर बाजारात आणले. पर्यावरणस्नेही मखर बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि रंग महागल्याने या मखरांचे भाव २०० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. 

मोदक, पेढे
गणपतीला प्रसाद म्हणून माव्याच्या मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. यंदा माव्याचे मोदक ३० ते ५० रुपयांनी महागले आहेत. ६२० ते ६४० रुपये किलोने मोदकांची विक्री होत आहे. इतर मिठाईही महागल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आमचा बराच माल लोक गावी नेतात; पण यंदा सांगली व कोल्हापूर येथे आलेल्या महापुरामुळे बाजारातील मंदीत भर पडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com