कांद्याने केला वांदा आणि ताटातली भाजी महागली,  गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम

भाग्यश्री भुवड 
Wednesday, 21 October 2020

भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे.

मुंबई : लॉकडाऊन, त्यापाठोपाठ अतिवृष्टीचे संकट या सर्व कारणमुळे भाजीपाल्यांचे दर सामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे. भाजीपाला महागल्यामुळे गृहिणींच्या बजेटवरही मोठा परिणाम झाला आहे. 

भाज्यांचे दर कडाडल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. लांबलेल्या पावसामुळे भाजीपाल्याचे उत्पादन आणि आवकही घटल्याने याचा भाज्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. कांद्याचे भाव तर शंभर रुपये किलोच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर टोमॅटोचे भाव 60 वर येऊन पोहोचल आहेत.दूसरिकडे भाजीपाल्याची आवक 30 ते 40 टक्के कमी झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात भाव आटोक्यात येण्याची शक्यता नाही.

महिन्याच्या भाजीला अतिरिक्त 500 रुपयांचा भार- 

साकिनाका येथे राहणारे गोविंद पाडावे हे दर महिन्याला आवडीप्रमाणे जवळपास 800 ते 1000 रुपयांची भाजी खरेदी करतात. पण, आता भाज्या महागल्याने त्यांना किमान 500 ते 600 रुपये अतिरिक्त मोजावे लागतात. 100 रुपयांच्या खाली एकही भाजी मिळत नाही. शिवाय, दर महिन्याला येणारा पगार ही निम्मा येत असल्यामुळे घरखर्च आणि मुलांचे शिक्षणाचा खर्च कसा भागवावा असा प्रश्न त्यांना कायम सतावतो. 

घरघुती मेसवरचे आर्थिक गणीत बिघडले 

दादर येथील प्रवीण नाईक नावाचे गृहस्थ घरगुती डब्बा बनवून देण्याचा व्यवसाय करतात. संपूर्णपणे शाकाहारी जेवण आणि भाजी पोळीचा डब्बा द्यावा लागत असल्या कारणाने त्यांना रोज वेगवेगळ्या भाज्या खरेदी कराव्या लागतात. दर महिन्याला किमान 10 ते 15 हजार रुपयांची भाजी ते खरेदी करतात. म्हणजे दिवसाला 400 ते 500 रुपयांपर्यंत भाजी त्यांना लागते. मात्र, या व्यवसायातून त्यांना गेल्या दोन महिन्यांपासून जास्त फायदा होत नाही. नाईक एक जेवणाचा डब्बा 70 रुपयांना देतात. ज्यात 3 चपात्या, भाजी ,वरण, भात आणि सलाड असे पदार्थ असतात. असे त्यांच्या कडे 16 ग्राहक आहेत. पण, त्यातून निम्मा खर्च ही निघत नसल्याचे प्रवीण नाईक यांनी सांगितले. 

कांद्याने केला वांदा , काय आहेत कारणे ? 

लॉकडाऊनमध्ये कांदे स्वस्त होते. मात्र, जून जुलै महिन्यात वादळ आल्याने कांद्याचे नुकसान झाले. बराच कांदा खराब झाला. सप्टेंबर महिन्यात नवा कांदा बाजारात उपलब्ध होतो. पण, सतत पडलेल्या पावसामुळे त्या कांद्याचेही नुकसान झाले. शिवाय, शेतकऱ्यांनी ज्या पिकांची लागवड केली तीही पिके चार पाच दिवसांपूर्वी पडलेल्या पावसात वाहून गेली. त्यामुळे, ही पोकळी निर्माण झाली आहे. किमान दोन महिने हे भाव असेच राहतील. आता इराण आणि इजिप्तमधील कांदा येत आहे. सध्या फक्त मुंबईच्या बाजारात कांदे स्वस्त आहेत. बाकी संपूर्ण राज्यात कांद्याचा भाव 75 रुपये किलोच्या पुढे असल्याचे एपीएमसी कांदा-बटाटा अडद व्यापारी संघटना अध्यक्ष राजेंद्र शेळके यांनी सांगितले आहे. 

बटाट्याच्या किमतींही भडकल्या - 

देशात नवरात्र सुरू होताच बटाट्यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. नवरात्रोत्सवात सामान्य लोक उपवासात बटाट्याचा आहार अधिक सेवन करतात. दिल्ली-एनसीआरसह देशातील बऱ्याच ठिकाणी बटाटा दर 60 रुपयांच्या पुढे गेला आहे. कोरोना साथीच्या काळात नवरात्री पूजन सुरू झाल्यामुळे बटाट्यांच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशात अतिरिक्त खर्च होत आहे. बाजारात 30 रुपये प्रतिकिलोला उपलब्ध बटाट्याचा भाव बाजारात 45 ते 50 रुपयांवर पोहोचल्याचं व्यापा-यांचे म्हणणे आहे. नवरात्रीतही किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबईत ठिकठिकाणचे भाज्यांचे दर वेगवेगळे आहेत. दादर, परऴ, लालबाग, दक्षिण मुंबईत भाजीपाल्याचे दर थोडे महाग आहेत.  तर कुर्ला, सांताक्रूज, गोवंडी, गोरेगाव या भागात भाजीपाल्याचे दर तुलनेने कमी असल्याचे चित्र आहे.  

गेल्या आठवड्याभरातील भाज्यांची किंमत-

  • कांदे - 70 रुपये किलो
  • बटाटा - 45 रुपये किलो
  • दुधी- 80 रुपये किलो
  • चवळी -30 रुपये किलो
  • मिरची- 120 रुपये किलो
  • कोबी - 80 रुपये किलो
  • भेंडी - 100 रुपये किलो
  • वांगी- 80 रुपये किलो 
  • गवार -120 रुपये किलो 
  • टोमॅटो – 60 रुपये किलो

( संपादन - सुमित बागुल )

rates of vegetables increased with the increase in rates of onion home budget collapsed


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rates of vegetables increased with the increase in rates of onion home budget collapsed