मुंबईतील नवीन 'उत्तम' लोकलबद्दल या आहेत मुंबईकरांच्या प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

नवीन उत्तम लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद.. 'उत्तम' लोकलला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद.. नवीन लोकलपेक्षा फेऱ्यामध्ये वाढ करा ; महिला प्रवाशांची मागणी

मुंबई  : पश्‍चिम रेल्वेवर मंगळवारपासून चर्चगेट ते विरार धीम्या मार्गवर सुरु झालेल्या उत्तम रेक ला दोन दिवस प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था आणि डब्यात सीसीटीव्ही कॅमेरेमुळे प्रवाशाना ही लोकल आकर्षित वाटली. मात्र, काही महिला प्रवाशांनी नवीन लोकलपेक्षा फेऱ्यामध्ये वाढ करा अशी नाराजी व्यक्त केली.

पश्‍चिम रेल्वेच्या 69 व्या स्थापना दिनानिमित्त प्रवाशांच्या सोयींसाठी पश्‍चिम रेल्वेने काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये मंगळवारी आणि बुधवारी ही प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणारी महिला विशेष लोकल चालविण्यात आली. ही लोकल चर्चगेटहुन संध्याकाळी 6.15 वाजता सुटून विरारला रात्री 7.57 वाजता पोहचली .

या लोकलमध्ये प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन बदल करण्यात आलेले आहेत. संपूर्ण डब्ब्यात सीसीटीव्ही कॅमेरे, लोकलमधील हॅंडलचं डिझाईन बदल, इमर्जन्सीसाठी लोकलमध्ये बटण, विजेची बचत करणारे पंखे आणि एलईडी लाईट्‌स, सामानाकरिता जादा जागा, अधिक चांगली आसनव्यवस्था देण्यात आली आहे. या लोकलमधील बदल खूप चांगले आहेत, मात्र महिलांची वाढती गर्दी याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत महिला प्रवाशांनी व्यक्त केले. 

लोकल बद्दल मुंबईकरांच्या प्रतिक्रिया : 

लोकलमधील बदल चांगले आहेत. मात्र नेहमीपेक्षा या लोकलची आसन व्यवस्था लहान दिसते. नेहमीच्या लोकलमध्ये एका आसनावर चौघीजणी बसतात मात्र या उत्तमच्या आसनावर तिघीच बसू शकतात. 

- प्रणाली दाते, दहिसर 

महिला डब्यातील डिझाईन चांगल्या पद्धतीची आहे. मात्र नवीन लोकल पेक्षा महिला विशेष लोकलच्या फेऱ्यामध्ये वाढ केली तर ते आमच्यासाठी फायदेशीर ठरेल. अंधेरीनंतर लोकलमध्ये पाय ठेवण्यासाठी जागा राहत नाही , याकडे रेल्वे प्रसाशनाने लक्ष दिले पाहिजे. 

- सुरेखा पांचाळ, बोरिवली  

WebTitle : reactions of mumbaikar on news uttam rake trains


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reactions of mumbaikar on news uttam rake trains