#पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरण्याचं 'हे' आहे खरं कारण..

रामनाथ दवणे
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

  • मराठी कलाकारांकडून व्हायरल केला गेला #पुन्हानिवडणूक? हॅशटॅग
  • भाजपला पाठिंबा देण्यासाठी हॅशटॅग व्हायरल?

सध्या राज्याचं राजकीय वातावरण तापलं असताना मराठी कलाकारांनीही यात उडी घेतलीय. आज सकाळपासून मराठी कलाकारांकडून #पुन्हानिवडणूक? हा हॅशटॅग वापरत मोहीम राबवली गेली. यात सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी अशा दिग्गज कलाकारांनी #पुन्हानिवडणूक? असं ट्विट केलं. त्यामुळे मराठी कलाकार अचानक हा हॅशटॅग का वापरतायत?  ही उत्सुकता सर्वांनाच होती.  

महाशिवआघाडी म्हणजेच काँग्रेस - राष्ट्रवादी - शिवसेना महाराष्ट्रात  सत्तास्थापनेच्या तयारीत असतानाच भाजपच सरकार स्थापन करेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलाय. त्यामुळं आता लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटणार, की पुन्हा निवडणुका होणार? या चर्चांना उधाण आलंय. अशात अचानक सिने कलाकारांनी एकत्रित येत या हॅशटॅगचा वापर केला आणि हा हॅशटॅग तुफान व्हायरल झाला. 

आता एखादी गोष्ट व्हायरल झाली म्हणजे भाजपलाच पाठिंबा देण्यासाठी हा हॅशटॅग वापरण्यात आलाय का? असा सवालही कॉंग्रेस नेत्यांकडून विचारण्यात आला.  

आता जाणून घ्या कारण : 

मराठी कलाकारांनी वापरलेला हॅशटॅग हा कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाच्या प्रचाराचा भाग नाहीये. हा #पुन्हानिवडणूक?  हॅशटॅग एका सिनेमाच्या प्रमोशनचा भाग आहे. धुराळा असं या सिनेमाचं नाव आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केल्याचं  आता उघड झालंय. या सिनेमात सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव आणि प्रसाद ओक यांनी या सिनेमात काम केलंय. 

समीर  विध्वंस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार आहेत आणि त्यांनी एकत्रित येत आज #पुन्हानिवडणूक? हा  हॅशटॅग वापरलाय. हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीच चित्रपटाशी संबंधित कलाकारांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केल्याचे समोर आलंय.

Webtitle : for this reason marathi actors and actress used punha nivadnuk hashtag


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: for this reason marathi actors and actress used punha nivadnuk hashtag