ठाणे जिल्ह्यातील कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी! शहरापाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये कोरोना नियंत्रणात

राहुल क्षीरसागर
Tuesday, 25 August 2020

ठाणे शहरापाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे - ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील तीन ते चार महिन्यांपासून कमालीची वाढ होत असल्याचे दिसून येत होते. त्यात जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे ठाणे शहरापाठोपाठ भिवंडी, उल्हासनगरमध्ये दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील पंधरवड्यापासून घट झाली असल्याचे दिसून येत आहे. तर, या शहरांमध्ये कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. असे असले तरी दुसरीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दररोज आजही रुग्णांची संख्या वाढती असल्याचे दिसून येत असल्यामुळे या दोन्ही शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आवाहन कायम असल्याचे दिसत आहे. 

विश्वासघाती सरकार, महाड इमारत दुर्घटनेनंतर नितेश राणेंचा सरकारवर हल्लाबोल

ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही दिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढते असल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतर बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस कमी जास्त असा चढ उतार दिसून येत आहे. त्यात मागील पंधरवड्यापासून ठाणे शहरासह भिवंडी आणि  उल्हासनगर या शहरांमकोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात नुकतेच ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून राज्यात पथम तर, देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ भिवंडी आणि उल्हासनगर शहरांमध्ये देखील कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. जिल्ह्याात मागील पंधरा दिवसात एकुण 17 हजार नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत.

पंधरा दिवसात आढळलेल्या या रुग्णांमध्ये भिवंडी शहरातील केवळ 297 करोना रुग्णांचा आणि उल्हासनगर शहरातील 426 रुग्णांचा समावेश आहे. तर, जून आणि जुलै महिन्यामध्ये ठाणे शहरातील दररोज 300 ते 350  हून अधिक रुग्ण आढळून येत होते. सध्या शहरात 100 ते 150 रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये शहरात दोन हजार 580 रुग्ण आढळून आले आहेत. तर, या तीनही शहरांमध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत असल्याने शहरातीन रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे भिवंडी शहरात सध्या केवळ 183, उल्हासनगरमध्ये 327 आणि ठाणे शहरात एक हजार 788 सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. 

भाज्यांचे दर कडाडले; गौरी गणपती सणामुळे भाज्यांनी गाठली शंभरी

दरम्यान, मीरा-भाईंदरमध्ये दोन हजार 88, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार 283, बदलापूरमध्ये 769 आणि अंबरनाथमध्ये 465 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी अनेक रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या मीरा-भाईंदरमध्ये एक हजार 451, ठाणे ग्रामीणमध्ये एक हजार 360, बदलापूरमध्ये 278 आणि अंबरनाथमध्ये 302 सक्रिय करोना रुग्ण उपचार घेत आहेत.
--------------------

नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील वाढ कायम
नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्ण वाढ कायम असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये नवी मुंबईत पाच हजार 148 तर कल्याण-डोंबिवलीत चार हजार 365 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरातील परिस्थिती चिंताजनक झाली असून शहरात या आजारामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये करोना संसर्ग रोखण्याचे आव्हान कायम आहे.

--------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reassuring news regarding corona in Thane district! Corona under control in thane city Bhiwandi, Ulhasnagar