सातबारा नक्कल शुल्काची पावतीच नाही? कर्जत महसूल विभागाचा अनागोंदी कारभार

हेमंत देशमुख
Sunday, 17 January 2021

सातबारा नक्कल काढण्यासाठी जी काही फी आकारण्यात येते, त्याची पावती संबंधित व्यक्तींना देणे क्रमप्राप्त असतानाही कर्जत तहसील कार्यालय आणि तलाठीकडून पावती दिली जात नाही

कर्जत  : सातबारा नक्कल काढण्यासाठी जी काही फी आकारण्यात येते, त्याची पावती संबंधित व्यक्तींना देणे क्रमप्राप्त असतानाही कर्जत तहसील कार्यालय आणि तलाठीकडून पावती दिली जात नाही. त्याचा हिशोबही दिला जात नाही. यासाठी कर्जत उपविभागीय कार्यालयाबाहेर पोलिस मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी 8 डिसेंबरला उपोषणही केले होते. मात्र, आश्वासनामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. आता महिना उलटला तरी माहिती न दिल्याने सोमवारी पुन्हा या विरोधात कर्जत टिळक चौकात उपोषण करणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. 

2014 पासून जमिनीचे सातबारा, 8/अ, गट नंबर प्रती पेपर 15 रुपये फी आकारून वितरित करण्याचे आदेश सर्व तलाठ्यांना देण्यात आले. यापैकी 5 रुपये शासनाकडे जमा करण्याचे आदेश आहे; परंतु 2014 ते सप्टेंबर 2018 पर्यंत तालुक्‍यातील तलाठ्यांनी एकही रुपया जमा केला नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी 8 डिसेंबरला प्रांत कार्यालयाबाहेर पोलिस मित्र कोकण विभागाचे अध्यक्ष रमेश कदम, माजी जिल्हा उपाध्यक्ष दशरथ मुने, भास्कर मुने, तालुका महासचिव कोळंबे, गणेश कदम, मोतीराम दळवी, सदाशिव कदम यांनी कर्जत प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते.

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

त्या वेळी नायब तहसीलदार सुधाकर राठोड, पुरुषोत्तम थोरात यांनी दखल घेत 15 दिवसांत चौकशी करणार असल्याचे पत्र देऊन उपोषण सोडण्यात सांगितले. मात्र, महिना ओलांडला तरी माहिती न दिल्याने नक्की तहसीलदार कोणाला पाठीशी घालत आहे. तसेच माहिती लपवण्याचे कारण काय? असा सवाल पोलिस मित्र संघटना विचारत असून, या विरोधात सोमवारी सकाळी 11 वाजता टिळक चौकात उपोषण करणार आहेत. 

receipt is not just a for duplicate saatbara charges by Karjat revenue department

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: receipt not giving for duplicate saatbara charges by Karjat revenue department