MHADA : 'म्हाडा’ मुंबईच्या ४,०८३ घरांसाठी अर्ज नोंदणी उद्यापासून सुरू; 'या' दिवशी सोडत

mhada
mhadaSakal

मुंबई - म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतर्गत विविध उत्पन्न गटांसाठी ४०८३ घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी आज सोमवार (ता.२२) पासून अर्ज नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणा-स्वीकृतीला दुपारी तीन वाजेपासून सुरुवात होणार आहे, अशी माहिती म्हाडा मुंबई मंडळाने दिली.

पात्र अर्जांची संगणकीय सोडत दि. १८ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा नाट्यगृहात काढण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली.

विक्रीकरिता उपलब्ध असलेल्या सर्व सदनिकांबाबत विस्तृत माहिती म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ https://housing.mhada.gov.in तसेच https://www.mhada.gov.in यांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे . इच्छुक अर्जदारांनी सहभाग घेण्याकरिता याच संकेत स्थळांचा वापर करावा, असे आवाहनही मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी संगणकीय आज्ञावलीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. म्हाडाने संगणकीय आज्ञावली अधिकाधिक पारदर्शक, सोपी, सुलभ आणि सुरक्षित केली आहे. सोडत प्रक्रियेमधे सहभागी होण्याकरिता नोंदणीकरण, कागदपत्र सादरीकरण, पात्रता निश्चिती, ऑनलाइन सोडत वितरण, सदनिकेच्या रकमेचा भरणा अशा सर्व प्रक्रिया मानवी हस्तक्षेपा विरहित १०० टक्के ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.

अर्ज सादर करणे - दि. २६ जून, २०२३ सहा वाजेपर्यंत)

अनामत ऑनलाईन भरणा: दि. २६ जून, २०२३ (रात्री ११. ५९ वाजेपर्यंत)

अनामत रक्कम भरणा बँकेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे : दि. २८ जून (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)

प्राप्त अर्जांची प्रारूप यादी: दि. ०४ जुलै, २०२३ (दुपारी ३ वाजता अधिकृत संकेतस्थळांवर प्रसिद्ध)

ऑनलाइन दावे व हरकती: दि. ०७ जुलै( दुपारी ३ वाजेपर्यंत)

स्वीकृत अर्जांची अंतिम यादी: दि. १२ जुलै(दुपारी ३ वाजता)

एकूण सदनिका - ४०८३

अत्यल्प – २७९०

अल्प – १०३४

मध्यम – १३९

उच्च – १२०

अत्यल्प उत्पन्न गट: पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १९४७, अ‍ॅन्टॉप हिलमधील ४१७ तर, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमधील ४२४ अशी एकूण २७८८ सदनिका समाविष्ट आहेत.

अल्प उत्पन्न गट: या गटात एकूण १०३४ सदनिका असून गोरेगावमधील पहाडी परिसरातील ७३६ सदनिकांचा त्यात समावेश आहे. उर्वरित सदनिका लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, सिद्धार्थनगर - गोरेगाव पश्चिम, डीएन नगर -अंधेरी, पंत नगर -घाटकोपर, कन्नमवार नगर विक्रोळी, चारकोप कांदिवली, महावीर नगर कांदिवली, जुने मागाठाणे बोरिवली, गव्हाणपाडा मुलुंड, पीएमजीपी मानखुर्द, मालवणी मालाड आदी ठिकाणची आहेत.

मध्यम उत्पन्न गट: या गटासाठी १४० सदनिका उपलब्ध करून दिल्या असून या सदनिका उन्नतनगर गोरेगाव पश्चिम, महावीर नगर कांदिवली, जुहू, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व, सहकार नगर चेंबुर, लोकमान्य नगर दादर, अँटॉप हिल वडाळा, भायखळा, टिळकनगर चेंबुर, चांदिवली पवई, गायकवाड नगर मालाड, प्रतीक्षा नगर सायन, चारकोप कांदिवली येथे आहेत.

उच्च उत्पन्न गट: या सदनिका जुहू अंधेरी पश्चिम, वडाळा पश्चिम, ताडदेव, लोअर परळ, शिंपोली कांदिवली, तुंगा पवई, चारकोप कांदिवली, सायन पूर्व येथे आहेत.

उत्पन्न मर्यादा

अत्यल्प उत्पन्न गटाकरिता (EWS) वार्षिक सहा लाख रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटाकरिता (LIG) वार्षिक नऊ लाख रुपयापर्यंत, मध्यम उत्पन्न गटाकरिता (MIG) बारा लाख रुपयांपर्यंत, उच्च उत्पन्न गटाकरिता (HIG) कमाल उत्पन्न मर्यादा नाही. वरील चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित करण्यात आलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करू शकतात. प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांची किंमत केंद्र व राज्य शासनाचे प्रती सदनिका एकूण अनुदान अडीच लाख रुपये वजा करून निश्चित करण्यात आली आहे.

अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी

अर्जदारांनी सोडतीविषयक सविस्तर माहितीसाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे अवलोकन होणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करतेवेळी अर्जदारांना येणाऱ्या अडचणींसाठी मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com