नवी मुंबईच्या रुग्णांना दिलासा; रहेजा युनिर्व्हसलमध्ये नवे विलगीकरण केंद्र

विक्रम गायकवाड
Sunday, 13 September 2020

नवी मुंबई महापालिकेने नेरूळ एमआयडीसीतील मे. रहेजा युनिर्व्हसल प्रा. लि. यांच्या मालकीच्या जागेत 1700 खाटांचे कोव्हिड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने नेरूळ एमआयडीसीतील मे. रहेजा युनिर्व्हसल प्रा. लि. यांच्या मालकीच्या जागेत 1700 खाटांचे कोव्हिड केअर सेंटर (सीसीसी) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. महिन्याभरात हे सेंटर उभारल्यानंतर महापालिकेला आता पनवेल येथील इंडिया बुल्समध्ये बाधितांना विलगीकरणासाठी पाठविण्याची आवश्यकता भासणार नाही.

शिवकेबल सेना ही संवैधानिक संस्था नाही; रिपब्लिक टीव्हीने केलेली याचिका निकाली 

कोव्हिड-19 रुग्णांवर आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाईक व मित्रमंडळींवर उपचारासाठी आणि त्यांचे विलगीकरण करण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत 10 लहान-मोठे कोव्हिड केअर सेंटर उभारले आहेत. या सेंटरमध्ये 1600 पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. काही दिवसांपासून नवी मुंबईत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याने महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नवी मुंबई महापालिकेने नेरूळ एमआयडीसी परिसरातील मे. रहेजा युनिर्व्हसल प्रा.लि.च्या जागेत भव्य विलगीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. ही जागा 12 लाख 49 हजार 675 प्रति महिना भाडेत्तत्वावर घेतल्याची माहितीही त्यांनी दिली.

वय वर्ष 20 पण चोरल्या तब्बल 10 बुलेट; नंबर प्लेट काढून 40-50 हजारात विक्री 

पालिकेचा अतिरिक्त खर्च
भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेचा भाड्याच्या मुदतीमधील मालमत्ता कर महापालिका माफ करणार आहे. येथे वीजमीटर व नळजोडणी वेगळे बसविले जाणार असून ते महापालिकेमार्फत भरण्यात येणार आहे. यशिवाय एमआयडीसीमार्फत आकारले जाणारे सबलेटिंग चार्जेस महापालिकेतर्फे भरले जातील किंवा हे चार्जेस एमआयडीसीकडून माफ करून घेण्याच्या विचाराधीन महापालिका आहे. 

केंद्राची रचना
एकूण क्षेत्र - 76,870 चौरस फूट
बी-3 व बी-4 दोन शेड्स - 64,785 चौरस फूट
कॅन्टीन क्षेत्र - 12,055 चौरस फूट
खाटा - 1700

इतर केंद्र
यापूर्वी पनवेल येथील इंडिया बुल्स गृहप्रकल्पात महापालिकेने विलगीकरण केंद्र सुरू केले होते. परंतु, हे केंद्र शहरापासून दूर असल्याने नवी मुंबई महापालिका हद्दीतील रुग्ण व त्यांच्या संपर्कातील नातेवाईक ज्यांना कमी लक्षणे आहेत किंवा नाहीत ते नागरिक त्या ठिकाणी जाण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील जवळपास 10 ठिकाणी लहान-मोठे विलगीकरण केंद्र महापालिकेने उभारले आहेत. तसेच सुमारे 2200 पेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांची उभारणी महापालिकेने केली आहे. तर जवळपास 350 व्हेंटिलेटर खाटा महापालिकेने विविध रुग्णालयांमध्ये कार्यान्वित केल्या आहेत.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief to Navi Mumbai patients New Separation Center at Raheja Universal