प्रजासत्ताक दिन संचलनात लोकमान्यांवर चित्ररथ

श्रद्धा पेडणेकर
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

मुंबई - 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!' अशी सिंहगर्जना लोकमान्य टिळकांनी केली आणि केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशाच्या अनेक भागांत त्याचे पडसाद उमटले. प्रभावी वक्ते, उत्तम राजकारणी, ब्रिटिशांच्या मनात धास्ती निर्माण करणारे धडाडीचे संपादक, गीतेवर टीकात्मक "गीतारहस्य' लिहिणारे अभ्यासक असे लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आहेत. महाराष्ट्राला लोकमान्य टिळकांच्या स्वरूपात लाभलेल्या या विचारवैभवाचे दर्शन दिल्लीतील राजपथावर यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात चित्ररथाच्या स्वरूपात घडणार आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील राजपथावर देशातील विविध राज्यांतील संस्कृतीचे दर्शन चित्ररथांच्या संचलनात होते. यंदा "स्वराज्य'च्या घोषणेच्या शतकपूर्तीचे निमित्त साधून महाराष्ट्राच्या वतीने लोकमान्य टिळक यांच्यावर आधारित असलेला चित्ररथ तयार करण्यात आला आहे. त्याचे डिझाइन प्रसिद्ध कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी केले आहे. संरक्षण मंत्रालयाच्या नियमांच्या कसोट्यांतून गेल्यानंतर महाराष्ट्राच्या चित्ररथाची निवड झाली आहे. 2015 मध्ये झालेल्या "पंढरीची वारी' या चित्ररथाला प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्याचे डिझाइनही चंद्रशेखर मोरे यांनीच केले होते. त्यानंतर 2016 मध्ये "रोटेशन' पद्धतीमुळे महाराष्ट्राला संचलनात सहभागी होता आले नव्हते. यंदा पूर्ण तयारीनिशी या संचलनात महाराष्ट्र सहभागी होत आहे.

Web Title: Republic Day parade on chitrarath lokamanya