जंजिरा पाहण्यासाठी जाताय तर, जरा थांबा! जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन निर्बंध वाचलेत का?

जंजिरा पाहण्यासाठी जाताय तर, जरा थांबा! जिल्हाधिकाऱ्यांचे नवीन निर्बंध वाचलेत का?

मुरूड : जंजिरा किल्ला पाहण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन निर्बंध लादले आहेत. एका दिवसात केवळ 400 पर्यटकांनीच किल्ला पाहावा, अशी जाचक अट ठेवल्याने बोटचालकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याचे मुख्य कारण सुरक्षित प्रवासासाठी येथे जेट्टी नसल्याने निर्बंध घालण्यात आल्याचे सांगितले आहे. सुरक्षित प्रवासाची जोपर्यंत हमी मिळत नाही, तोपर्यंत निर्बंध न उठवण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 
बोटींमध्ये अनेक वेळा प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांना घेतले जाते. गर्दीच्या वेळी बोटीतून किल्ल्यात सुरक्षितपणे उतरण्यासाठी जेट्टी नसल्याने लहानांपासून वृद्ध व्यक्तींना कसरत करावी लागते. भविष्यात कोणती दुर्घटना घडू नये म्हणून गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र, ही अट येथील बोटमालकांना मान्य नाही. या वादात जंजिरा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांना किल्ल्यात न जाताच परत यावे लागते. हे निर्बंध मागे घेण्यासाठी मुरूड तालुका शेकापचे चिटणीस व नगरसेवक मनोज भगत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीचे कोणतेही निवेदन आपल्यापर्यंत पोहचले नसल्याचे सांगत हे निर्बंध लवकर न उठवण्याचे संकेत दिले आहेत. 

राजपुरी खाडीत चारी बाजूने पाण्याने वेढलेला जंजिरा किल्ला पाहण्यासाठी राजपुरीसह खोरा बंदर, दिघी, आगरदांडा येथून बोटीतून जाता येते. विशेषतः वीकेण्डला ही गर्दी मोठ्या प्रमाणात असते. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 400 पर्यटकांनीच किल्ल्यात जावे, ही जाचक अट पाच जलवाहतूक संस्थांना मान्य नाही. मोजक्‍याच पर्यटकांना किल्ल्यात प्रवेश दिल्यानंतर पर्यटक आणि बोटमालक यांच्यात शाब्दिक चकमकी घडत असतात. लॉकडाऊनमुळे मागील 10 महिने बेरोजगारीचे चटके सहन करावे लागले आहेत. बोटचालकांचे प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध हटवावेत, अशी मागणी मनोज भगत यांनी केली आहे. या वेळी महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाचे संचालक विजय गिदी, राजपुरी सरपंच हिरकणी गिदी, जंजिरा पर्यटक संस्थेचे अध्यक्ष इस्माईल आदमने, व्यवस्थापक नाझ कादरी व बोटचालक यांच्यात झालेल्या चर्चेअंती ही मागणी केली आहे. 

कामगारांवर उपासमारीची वेळ 
सध्या जंजिरा किल्ल्यासाठी राजपुरीवरून 13 शिडाच्या बोटी सोडण्यात येत आहेत. तर खोरा बंदर, आगरदांडा, दिघी या बंदरावरून 13 यांत्रिकी बोटी आहेत. या साधारण 26 बोटींवर काम करणाऱ्या कामगारांच्या दीडशेहून अधिक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. बोटींच्या संख्येनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या पर्यटकांची संख्या फारच त्रोटक आहे. कमी पर्यटकांना किल्ल्यापर्यंतची ने-आण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. 

रायगड जिल्ह्यात अन्यत्र पर्यटकांच्या संख्येवर निर्बंध नाहीत. हजारो पर्यटक समुद्रकिनारी मुक्तपणे फिरत असतात. परंतु, जंजिरा किल्ल्यासाठीच संख्येचे निर्बंध आहेत. आठ महिन्यांपासून रोजगार नव्हता. तो आता कुठे मिळू लागला होता. त्यावरही गदा न आणत आहे. जिल्हाधिकारी व पुरातत्त्व खात्याने यासाठी सहकार्य करावे. 
- मनोज भगत,
नगरसेवक, मुरूड नगरपालिका 

शेकापचे आमदार जयंत पाटील हेदेखिल संख्येवरील निर्बंध हटविण्याकामी प्रयत्न करत आहेत. यावर प्रशासनाने बोटचालकांशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, तरच हा पेच लवकर सुटू शकतो. 
- नाझ कादरी,
व्यवस्थापक, 
जंजिरा पर्यटक सहकारी जलवाहतूक सोसायटी 

किल्ल्यामध्ये जाणाऱ्यांची संख्या अचानक वाढली आहे. बोटीतून उतरण्यासाठी किल्ल्यात जेट्टीची व्यवस्था नाही. अनेक वेळा वयोवृद्ध व्यक्तींना कसरत करून उतरावे लागते. निर्बंध घालण्याचे मुख्य कारण कोरोनाचा नसून किल्ल्यात जाण्यासाठी बोटीतून करावा लागणारा प्रवास धोकादायक आहे, हे आहे. मेरीटाईम बोर्डाने पुरातत्त्व विभागाकडे जेट्टीचा प्रस्ताव पाठवला आहे. पुरातत्त्व विभागाने अद्याप हा प्रस्ताव मान्य केलेला नाही. 
- निधी चौधरी,
जिल्हाधिकारी, रायगड 
 

Restrictions on safe travel remain Jetty sanction proposal sent by the Collector; Financial blow to boatmen

------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com