ठाण्यात फेरीवाल्यांचे पुन्हा बस्तान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. रेल्वेस्थानकासह गोखले रोडपर्यंत फेरीवाल्यांनी पुन्हा कब्जा केला आहे. यामध्ये फळवाल्यांपासून कपडे विक्रेते आदी सर्व फेरीवाल्यांचा समावेश आहे.

ठाणे : रेल्वेस्थानक परिसरात फेरीवाले आणि काही मोजक्‍या मुजोर रिक्षाचालकांवरील तात्पुरती कारवाई पुन्हा दिखावा ठरली आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली या फेरीवाले आणि रिक्षाचालकांकडे पालिकेसह वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा त्यांनी येथील रस्त्याचा ताबा घेतला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना उरलेल्या टिचभर रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.
   
सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून फेरीवाल्यांचे प्रस्थ वाढले आहे. रेल्वेस्थानकासह गोखले रोडपर्यंत फेरीवाल्यांनी पुन्हा कब्जा केला आहे. यामध्ये फळवाल्यांपासून कपडे विक्रेते आदी सर्व फेरीवाल्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांच्या विरोधात स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांच्यासह अनेक नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. तसेच सर्वसाधारण सभेत या विषयावर थेट प्रभाग समितीवरील सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली होती.

नौपाडा प्रभाग समितीमधील सहाय्यक आयुक्त अथवा तेथील कर्मचाऱ्यांवर वारंवार टीका होऊनही येथील कर्मचारी स्वस्थच बसल्याचे दिसते आहे. त्यातही येथील फेरीवाल्यांचे नेते आणि कर्मचाऱ्यांमधील ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे रेल्वेस्थानकातील पदपथ पुन्हा फेरीवाल्यांच्या ताब्यात गेले आहेत. महापालिका अथवा वाहतूक पोलिसांकडून काही काळापुरता कारवाई केल्यानंतर पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान बसत असते. स्टेशन परिसरातील फेरीवाले, अनधिकृत शेअर रिक्षा चालक यांच्याविरोधात महासभेत आवाज उठविल्यानंतरही त्यावर कारवाई नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. 

रिक्षाचालकांची दादागिरी वाढली
  अनधिकृत शेअर रिक्षा थांब्यामुळे सायंकाळच्या वेळेत रिक्षाचालकांच्या ताब्यातच रेल्वेस्थानक परिसरातील रस्ते असतात. रिक्षाचालकांना हटकले असता, संबंधित पादचाऱ्यांना त्यांच्या दमदाटीला सामोरे जावे लागते. रेल्वेस्थानकापासून गावदेवी मंदिरापर्यंतचे सर्व रस्ते या रिक्षाचालकांनी ताब्यात घेतल्याचे चित्र आहे. त्यातही सॅटीस येथील वाहतूक पोलिस चौकी हटविण्यात आल्यानंतर या काही मोजक्‍या मुजोर चालकांचे फावले आहे. कारवाई झाल्यानंतर तथाकथित रिक्षाचालकांचे नेतेही मुजोर रिक्षाचालकांच्या बाजूने रस्त्यावर उतरत असल्याने या रिक्षाचालकांची दादागिरी वाढलेली आहे.

   रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या समस्येकडे मी यापूर्वी उपोषणाच्या माध्यमातून लक्ष वेधले होते. तसेच वारंवार येथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. पण पालिकेतील कर्मचारी केवळ काही काळापुरता या फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करत असतात. सायंकाळी रेल्वेस्थानकातून लाखो पादचारी रस्त्यावर येत असतात. अशावेळी परिसरात वाहतूक कोंडी होते. या फेरीवाल्यांमुळे या वाहतूक कोंडीमध्ये भर पडते. 
- संजय वाघुले, स्थानिक नगरसेवक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A reunion of the Hawkers at Thane