सुशांतच्या बहिणींविरोधात रियानं केलेले आरोप निव्वळ अंदाज- सीबीआय

सुनीता महामुणकर
Thursday, 29 October 2020

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिली हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेला आरोप निव्वळ अंदाज आणि गृहितक वापरून केलेला आहे, असा खुलासा सीबीआयने केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली फिर्यादही अयोग्य आहे, असा सनसनाटी दावाही केला आहे.

मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूतला त्याच्या बहिणीने बोगस प्रिस्क्रिप्शनद्वारे प्रतिबंधित औषधे दिली हा अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केलेला आरोप निव्वळ अंदाज आणि गृहितक वापरून केलेला आहे, असा खुलासा सीबीआयने केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेली फिर्यादही अयोग्य आहे, असा सनसनाटी दावाही केला आहे.

रियाने सुशांतच्या बहिणी प्रियांका आणि मितू सिंह यांच्यासह दिल्लीतील एका डॉक्टरांविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोगस प्रिस्क्रिप्शन तयार करुन ती औषधे सुशांतला देण्यात आली असा आरोप यामध्ये आहे. ही तक्रार रद्द करण्यासाठी सिंह बहिणींनी एड माधव थोरात यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

अधिक वाचा-  दिवसाला 500 रूपयांचा प्रवास खर्च, गर्दीला कंटाळून प्रवाशांना सोसावा लागतोय अतिरिक्त भुर्दंड

यामध्ये बुधवारी सीबीआयकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले. रियाने केवळ काल्पनिक अंदाज वर्तविला आहे आणि या अंदाजावरुन एफआयआर दाखल होऊ शकत नाही, असे सीबीआय म्हणते. तसेच सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करीत आहे आणि फौजदारी दंड संहितेनुसार एकाच घटनेवर दोन एफआयआर असू शकत नाही, त्यामुळे मुंबई पोलिसांनी मुळात हा एफआयआर दाखल करायलाच नको हवा होता, त्यांनी रियाची तक्रार सीबीआयकडे पाठवायला हवी होती. पण मुंबई पोलिसांनी कोणताही पुरावा न पाहता एफआयआर दाखल केला, असा आरोप सीबीआयने केला आहे. जर रियाला सुशांत आणि त्याच्या बहिणीच्या मोबाईल चॅटची माहिती होती तर ती तिने यापूर्वी सीबीआयला का दिली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे.

अधिक वाचा-  जानेवारीत कोरोना लस येण्याची शक्यता; प्राध्यान्याने कोरोना लस देण्यासाठी नियोजन सुरू

रियाच्या वतीने एड सतीश मानेशिंदे यांनी मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केले असून सिंह बहिणींची याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. तर याचिकेवर लवकर सुनावणी घेण्याची मागणी सिंह यांनी केली आहे. पुढील आठवड्यात ४ नोव्हेंबरला याचिकेवर सुनावणी होणार आहे.

-------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Rhea chakraborty allegations against Sushant sisters are pure guess CBI


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rhea chakraborty allegations against Sushant sisters are pure guess CBI