अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

सुनीता महामुणकर
Wednesday, 7 October 2020

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं रियाला जामीन मंजूर केला आहे. तर रियाचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज नामंजूर केला.

मुंबईः सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अंमलीपदार्थांचा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून रिया चक्रवर्तीला दिलासा मिळाला आहे.  न्यायालयाने तिला सशर्त जामीन मंजूर केला आहे. मात्र रियाचा भाऊ शौविकसह अन्य एकाला  जामीन नामंजूर केला आहे.

सुशांतसाठी अंमलीपदार्थ घेतले होते, मात्र त्याचे सेवन केले नाही, असा युक्तिवाद रियाच्या वतीने एड सतीश मानेशिंदे यांनी केला होता. एनडीपीएस कायद्याच्या तरतुदीमुळे शौविक आणि अब्दुल बसित परिहार यांचा जामीन न्या सारंग कोतवाल यांनी नाकारला. आरोपी सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. पारपत्र पोलिसांना ताब्यात देण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच एक लाख रुपयांचा जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. 

शौविकसह परिहार अंमलीपदार्थ खरेदी विक्रीमध्ये आहेत असा आरोप एनसीबीने केला आहे.  मागील एक महिन्यापासून रिया कारागृहात आहे. तिला जामीन मंजूर करु नये, अंमलीपदार्थ व्यवहारात ती सामील आहे, असा युक्तिवाद एनसीबीने केला होता.

रियाच्या जामीनामुळे आम्ही समाधानी आहोत. सत्य आणि न्यायाचा विजय झाला आहे. कायद्यात असलेल्या तरतुदीबाबत केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आहे. तिच्या कोठडीची आवश्यकता नव्हती. आमची सत्याशी बांधिलकी कायम आहे, अशी प्रतिक्रिया एड मानेशिंदे यांनी दिली.

----------------

(संपादनः पूजा विचारे)

Rhea chakraborty bail grants bombay high court 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rhea chakraborty bail grants bombay high court