'सुशांतच्या आत्महत्येचं भांडवल केलं जातंय'; रिया चक्रवर्तीची सुप्रीम कोर्टात धाव

टीम ई-सकाळ
Monday, 10 August 2020

रियाची आज, ईडी मार्फत (अंमलबजावणी संचालनालाय) दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. पहिल्या चौकशीत रियानं फारशी समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं बोललं जात होतं.  

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लागतंय. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि सुशांत यांच्यात झालेल्या आर्थिक व्यवहारांमुळं सुशांतच्या वडिलांनी रियावर आरोप केले होते. सुशांतकडून रियाने 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. तिच्या विरोधात बिहारमध्ये एफआयआरही दाखल केले. आता रियाने याप्रकरणात पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. 

देशभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

रियाची पुन्हा चौकशी 
रिया चक्रवर्ती आणि सुशांतसिंह राजपूत यांच्यातील संशयित आर्थिक व्यवहारांची सध्या चौकशी सुरू आहे. रियाची आज, ईडी मार्फत (अंमलबजावणी संचालनालाय) दुसऱ्यांदा चौकशी सुरू आहे. पहिल्या चौकशीत रियानं फारशी समाधानकारक उत्तरं दिली नसल्याचं बोललं जात होतं.  रियासह तिचे वडील, तिचा भाऊ शोविक आणि सुशांतची पूर्वीची मॅनेजर श्रृती मोदी यांची चौकशी ईडीकडून करण्यात येत आहे. ईडीकडून पहिल्या टप्प्यात नऊ तास कसून चौकशी झाल्यानंतरही आज, रिया चक्रवर्तीची पुन्हा चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, या चौकशीपासून दूर राहता यावे यासाठी रियाने यापूर्वी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी रियाची चौकशी झाल्यानंतर, शनिवारी रियाचा भाऊ शौविकची जवळपास 18 तास चौकशी झाली. आज, रिया सोबत तिच्या वडिलांचीही चौकशी सुरू आहे. त्याचबरोबर सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिटानी याचीही ईडी मार्फत चौकशी सुरू आहे. 

जगभरातील इतर घडामोडींसाठी येथे क्लिक करा

रिया पुन्हा सुप्रीम कोर्टात धावली 
रिया चक्रवर्तीने आता पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून दिवसभर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या बातम्या टेलिकास्ट केल्या जात आहेत. त्यात रिया चक्रवर्ती विरोधात वातावरण तयार केलं जातंय. या मीडिया ट्रायलच्या विरोधात रिया चक्रवर्तीनं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या आत्महत्याप्रकरणाचं भांडवल केलं जातंय, अशा स्वरूपाचं मत रियानं सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केलंय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea chakraborty plea supreme court against media trial