रियाच्या अटकेनंतर वकील म्हणतात,'ही तर न्यायाची चेष्टाच'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 8 September 2020

अमली पदार्थांच्या सेवनावरून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांत सावंत या तिघांच्या अटकेनंतर रियाभोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला होता. 

मुंबई, ता. ८ : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणी रिया चक्रवर्तीला केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) आज अटक केली. मंगळवारी तिसऱ्यांदा रियाची चौकशी केल्यानंतर एनसीबीने ही कारवाई केली. सुरुवातीला अमली पदार्थांचे सेवन करत नसल्याचा दावा करणाऱ्या रियाने अखेर चौकशीदरम्यान ड्रग्ज सेवनाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ड्रग्जसाठी रिया शौविकला सूचना करत होती. त्यानुसार अब्दुल आणि जैदच्या संपर्कात राहून शौविक अमली पदार्थ मिळवत. त्यानंतर ते सॅम्युअल मिरांडाकडे देत असे. त्यानंतर रियाच्या सांगण्यावरून दीपेश ते ड्रग्ज घेऊन येत असल्याची कबुली रियाने दिल्याची माहिती आहे. अमली पदार्थांच्या सेवनावरून रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा, सुशांत सावंत या तिघांच्या अटकेनंतर रियाभोवती चौकशीचा फास एनसीबीने आवळला होता. मंगळवारी चौकशीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर रियाच्या अटकेच्या प्रक्रियेला ‘एनसीबी’ने सुरुवात केली.

ही तर न्यायाची चेष्टाच!
‘‘एका ड्रग ॲडिक्‍ट मुलावर प्रेम केले आणि त्याची काळजी घेतली. त्यासाठी तीन प्रमुख केंद्रीय तपास यंत्रणांनी एकट्या रिया चक्रवर्तीला वेठीस धरले. ही तर न्यायाची चेष्टाच आहे,’’ अशी प्रतिक्रिया रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी तिच्या अटकेनंतर दिली. कित्येक वर्षांपासून सुशांत मानसिक आजारावर मुंबईतील पाच प्रमुख मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होता. शेवटी त्याने आत्महत्या केली. चुकीच्या पद्धतीने दिलेली औषधे आणि ड्रग्ज त्यासाठी कारणीभूत आहेत, असेही मानेशिंदे म्हणाले. 

हे वाचा - बेकायदा बांधकामप्रकरणी कंगनाला BMC नोटीस; चटई क्षेत्र नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा

रियाने बॉलीवूडमधील अनेकांची नावे केली उघड
एनसीबीने सोमवारी केलेल्या चौकशीत रियाने अमली पदार्थ स्वतः विकत घेणे, हातात घेणे याबाबत स्पष्ट नकार दिला होता. तसेच यादरम्यान रियाने बॉलीवूडमधील जवळपास १९ बड्या लोकांची नावे घेतल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे आता या सेलिब्रिटींवरही चौकशीची टांगती तलवार आहे. ‘एनसीबी’ने आतापर्यंत याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. सुशांतसिंहला अमली पदार्थ आणून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या चौकशीत यापूर्वीच रियाचे नाव आले होते. त्यामुळे रियाच्या अटकेची औपचारिकताच बाकी होती. बुधवारी रियाला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rhea s lawyer reaction after arrest her in drug case by ncb