बहरलेल्या भातपिकाला ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सप्टेंबर महिना सुरू झाला, तरी कायम आहे.

माणगाव (बातमीदार) : जून महिन्याच्या १५ तारखेपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार सप्टेंबर महिना सुरू झाला, तरी कायम आहे. जिल्ह्यात सर्वत्र आठ ते १० दिवस उशिराने सुरू झालेल्या पावसाने भातपिकाची लावणीची कामे वेळेत पूर्ण केली. मात्र, गेली अडीच महिने पावसाने संततधार सुरूच ठेवली आहे.

सतत पडणारा पाऊस व पूरसदृश्‍य स्थिती यामुळे तालुक्‍यातील भातशेती सतत पाण्याखाली आहे. सुरुवातीच्या चांगल्या पावसामुळे लावणीची कामे जून महिन्यात पूर्ण झाली होती; मात्र त्यानंतरही पाऊस कायम राहिल्याने भाताच्या रोपांची वाढ झाली नाही. दोन महिन्यानंतर लोंबीत येणारी भातपिकाची रोपे सततच्या पावसामुळे मुरझली असून पिवळी पडली आहेत. परिणामी, भाताचे पीक संकटात असल्याने शेतकरी चिंतीत झाले आहेत. यापुढेही असाच पाऊस सुरू राहिल्यास भाताच्या लोंबींना पळज निर्माण होऊन पिकांचे पूर्ण नुकसान होणार आहे. संततधार पावसाने भाजी पीक व मिरची आदी पिकांचे पूर्ण नुकसान केले असताना हाती आलेले भातपीकही नुकसानीत जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा, असे शेतकरी सांगत आहेत.

या कालावधीत भातपिकांना ऊन, वारा आवश्‍यक असतो. लोंबींना बहर येतानाच संततधार सुरू असल्याने भातशेती तोट्यात जाणार आहे. मिरची व इतर पिकांचे नुकसान झाले असताना भातपीकही वाया जात आहे. सरकारने याची दखल घ्यावी.
- नारायण मोंडे, शेतकरी, माणगाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice crop is now unsafe during heavy rain