परतीच्या पावसाचा भातशेतीला धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

श्रीवर्धन तालुक्‍यासह जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. २४) अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगडवासीयांची तारांबळ उडाली आहे. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे.

लोणेरे (वार्ताहर) : श्रीवर्धन तालुक्‍यासह जिल्ह्यात मंगळवारपासून (ता. २४) अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे रायगडवासीयांची तारांबळ उडाली आहे. यामुळे भातपिकाला नुकसानीचा तडाखा बसत आहे. हातातोंडाशी आलेल्या भातशेतीचे नुकसान तर होणार नाही? अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 

या वर्षी जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे तालुक्‍यातील भातशेती चांगल्या स्थितीत आहे. यामुळे उत्पन्न चांगले मिळेल म्हणून शेतकरी खूश होता. मात्र, दोन दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू झालेल्या परतीच्या पावसाने तालुक्‍यात भातशेतीची दाणादाण उडाली आहे. पुढील पंधरवड्यात तयार होणारी भातशेती कापणीयोग्य होऊनही विजांच्या कडकडाटासह जोरदारपणे पडणाऱ्या पावसामुळे उभी पिके धोक्‍यात आली आहेत. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सप्टेंबर महिना अर्धाअधिक संपत आला, तरी पाऊस थांबण्याची चिन्हे नाहीत. दिवसभरात व सायंकाळच्या सुमारास वर्दी देणारा परतीचा पाऊस सतत पडत असल्याने भातपिकाचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहे.

श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तसेच महाड तालुक्‍यातील चांगल्या पसवलेल्या भातशेतीला परतीच्या पावसाने धोका निर्माण केला आहे. समाधानकारक पावसामुळे भातशेती पसवून लोंबीवर आली आहे. अनेक ठिकाणी शेती कापण्यायोग्य झाली आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाने पिकलेली भातशेती आडवी करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या बाजूला वन्यप्राण्यांकडून अशा शेतीचे नुकसान केले जात आहे. वानर, डुक्कर शेतीमध्ये घुसून नुकसान करत आहेत. त्यामुळे बळीराजा धास्तावला होताच. त्या जोडीला परतीच्या पावसाने काही ठिकाणची भातशेती धोक्‍यात आली आहे.

जुलै महिन्यापासून समाधानकारक पडलेल्या पावसामुळे भातशेती उत्पन्न चांगले मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या भातशेती पसवून लोंबी वर आल्‍या आहेत. भाताबरोबर असलेले बाजूचे गवत काढण्याचे (बेरणी) काम सुरू आहे. पुढील पंधरवड्यानंतर भातशेती कापणीयोग्य होईल. मात्र, सध्या पडणाऱ्या पावसाचा जोर कायम राहिल्यास आम्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. 
- चंद्रकांत धुमाळ, मेंदडी कोंड, म्हसळा

लहरी हवामानामुळे भातशेतीवर रोगाच्या प्रादुर्भावाची लक्षणे दिसताच शेतकऱ्यांना फवारणी करण्याची सूचना देतो. अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी तसा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे.
- शिवाजी भांडवलकर, तालुका कृषी अधिकारी, श्रीवर्धन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rice crop is now unsafe during heavy rain