esakal | फेब्रुवारीत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ;  MMRTAच्या बैठकीत निर्णय होणार

बोलून बातमी शोधा

फेब्रुवारीत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ;  MMRTAच्या बैठकीत निर्णय होणार

मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सी प्रवास फेब्रुवारीपासून वाढण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात आता एमएमआरटीएची बैठक असून यामध्ये नवीन भाडेवाढीची शक्यता आहे.

फेब्रुवारीत रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ;  MMRTAच्या बैठकीत निर्णय होणार
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई: मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सी प्रवास फेब्रुवारीपासून वाढण्याची शक्यता आहे. टॅक्सी, रिक्षा संघटनांची जुनीच भाडेवाढीची मागणी आहे. त्यावर राज्य सरकार सकारात्मक असून डिसेंबर महिन्यात मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) च्या बैठकीत निर्णय होणार होता. मात्र निर्णय होऊ शकला नसून, फेब्रुवारी महिन्यात आता एमएमआरटीएची बैठक असून यामध्ये नवीन भाडेवाढीची शक्यता आहे.

मुंबई महानगरातील रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्णय झाला नाही. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी संघटना भाडेवाढीवर आग्रही आहे. यामध्ये टॅक्सीचे 3 रुपये भाडेवाढ करून 22 ऐवजी 25 रुपये करावे तर रिक्षाचे 2 रुपये वाढवून 18 ऐवजी 20 रुपये करण्याची मागणी आहे. यासाठी राज्य सरकार सुद्धा सकारात्मक असून, गेल्यावर्षात डिसेंबर महिन्यात यावर निर्णय होण्याची शक्यता होती. मात्र, काही संघटनांकडून कोरोनाच्या काळात भाडेवाढ करून फायदा होणार नसल्याचे मत मांडले होते. शिवाय नागरिक सुद्धा आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना परवडणार नसल्याने भाडेवाढ पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

हेही वाचा- Corona Virus Update: मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 94 टक्क्यांवर

त्यामुळेच डिसेंबर महिन्यात भाडेवाढीवर निर्णय झाला नाही. मात्र, या वर्षात आता फेब्रुवारी महिन्यात निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर टॅक्सी आणि रिक्षा संघटनांकडूनही भाडेवाढीची अपेक्षा आहे. या भाडेवाढीमुळे आता चिल्लरचा वाद मिटणार आहे. सध्या टॅक्सीचे 22 तर रिक्षाचे 18 रुपये देताना प्रवाशांमध्ये आणि वाहतुकदारांमध्ये वाद सुद्धा होते. मात्र नवीन भाडेवाढीमुळे चिल्लर पैशांचा वाद मिटणार असल्याचे टॅक्सी, रिक्षा चालकांकडून सांगितल्या जात आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
यापूर्वीच्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय झाला नाही. एमएमआरटीएची बैठक आता फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामध्ये टॅक्सीचे 25 रुपये आणि रिक्षाला 20 रुपये म्हणजे सरासरी 3 आणि रुपये भाडेवाढीची शक्यता आहे. तशी मागणी सुद्धा आहे. 
ए एल क्वाड्रोस, सरचिटणीस, टॅक्सी मेन्स युनियन

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Rickshaw and taxi fares will hike decision MMRTA meeting February