esakal | ATM मुळे कोरोना वाढण्याचा धोका
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

ATM मुळे कोरोना वाढण्याचा धोका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : कोरोना (Corona) रुग्णांची संख्या आटोक्‍यात आली असली, तरी संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत, सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. बँकांमध्ये (Bank) पाचपेक्षा जास्‍त ग्राहकांना एका वेळी सोडण्यात येत नाही. कर्मचाऱ्यांची पुरेशी काळजी घेतली जात असली, तरी एटीएम (ATM) केंद्रात येणाऱ्‍या नागरिकांच्या आरोग्‍याबाबत बँकांची (Bank) भूमिका उदासीन असल्‍याचे दिसून येत आहे.

ग्राहकांना एटीएम सुविधा पुरवणाऱ्या बँका कोरोनापासून बचावासाठी सरकारने आखून दिलेल्‍या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. कोणत्याही एटीएम केंद्रात सॅनिटायझर अथवा संसर्गापासून बचावासाठी आवश्‍यक यंत्रणा नाही. अनेक ग्राहक मास्‍क न लावताच एटीएम केंद्रात प्रवेश करीत आहेत.

मास्क नसल्यास ग्राहकांना दुकाने आणि आस्थापनांमध्ये प्रवेश बंद करण्याच्या सूचना आहेत. दुकाने आणि आस्थापनाबाहेर तशा प्रकारचे फलक लावण्याच्या तसेच सॅनिटायझर ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत; मात्र या अटी आणि शर्तींना खासगी तसेच सरकारी बँका अपवाद ठरत आहेत. एटीएम केंद्रात प्रवेश करताना सॅनिटायझरची सुविधा उपलब्‍ध करून देणे गरजेचे आहे. तसेच परिसर स्‍वच्छ ठेवण्याची जबाबदारीही बँकांची आहे. मात्र तसे होत नसल्‍याने एटीएममध्ये येणारे ग्राहक कोरोना स्प्रेडर होण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा: शहरी-ग्रामीण दरी पुसल्याने डिजिटल संधी

सॅनिटायझेशन गरजेचे

शहरी भागात अनेक ठिकाणी असलेली रुग्णालये, दवाखाने परिसरात विविध बँकांची एटीएम सेंटर आहेत. कोरोना रुग्ण अथवा रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींकडून एटीएम वापरले जात असल्याची शक्यता असल्याने वेळोवेळी एटीएम मशीन, केंद्राचे सॅनिटायझेशन होणे गरजेचे आहे.

शासनाने काढलेल्या अध्यादेशात, कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना बँकांनाही करण्यात आल्या आहेत; तरीसुद्धा सूचनेचे पालन केले जात नसल्यास आयुक्तांच्या आदेशानुसार, बँक कार्यालयांना कोरोना प्रतिबंधात्‍मक नियमांबाबत पुन्हा सूचना केल्‍या जातील.

- डॉ. आनंद गोसावी, पालिका आरोग्य विभाग

loading image
go to top