Thane Rain Updates : ठाणे जिल्ह्यात नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे.
thane district rain
thane district rainsakal

ठाणे - ठाणे जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. त्यात अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या असून जिल्ह्यातील काळू आणि उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

यामुळे नदी पात्रालगतच्या गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून अनेक गावांतील नागरिकांचे बीएसयूपी, म्हाडा कॉलनी, शाळा व समाज मंदिर आदी ठिकाणी जवळपास सहा हजार ६७७ नागरिकांचे स्थलांतर केले होते. गुरुवारी दुपारपर्यंत पाच हजार २१५ कुटुंबे ही त्यांच्या स्वगृही परतली असून अजूनही एक हजार ४६२ नागरिक पर्यायी ठिकाणी वास्तव्यास असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी १४५.७ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात गुरुवारीदेखील दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, मोहाने आणि जांभूळपाडा या गावांमधून उल्हास नदी वाहते. टिटवाळा गावातून काळू नदी वाहते.

मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे या दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी गाठली असून दोन्ही नद्या दुधडी भरून वाहत आहेत. यामुळे नदी पात्रालगतच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच बदलापूर तालुक्यातील सोनिवली व हेंद्रेपाडा येथील सुमारे २०० कुटुंबांना बदलापूर येथील बीएसयूपी इमारतीत, सोनिवली येथील यादव नगर भागातील लोकांना म्हाडा कॉलनी सोनिवली या ठिकाणी हलविण्यात आले होते.

अंबरनाथ येथील सहवास वृद्धाश्रमामधील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले होते. उल्हास नदीची पाणी पातळी वाढली असल्यामुळे कल्याण तालुक्यातील मौजे कांबा येथील मोरयानगर येथील चाळींमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे या ठिकाणच्या ९० कुटुंबांचे स्थलांतर कांबा गावातील इतर रिकाम्या असलेल्या घरामध्ये तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आले होते. सत्कर्म बालकाश्रमातील २२ मुलांना प्रगती अंध विद्यालय बदलापूर येथे हलविण्यात आले होते.

मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे जवळपास ६ हजार ६७७ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले होते. गुरुवारी दुपारपर्यंत पाच हजार २१५ कुटुंबे ही त्यांच्या स्वगृही परतली असून अजूनही एक हजार ४६२ नागरिक आजही शाळा, समाज मंदिरांमध्ये आहेत.

यामध्ये सर्वाधिक एक हजार १२२ अंबरनाथ तालुक्यातील असून उल्हासनगर येथील २५० आणि कल्याणमधील ९० कुटुंबांतील नागरिक हे पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी आहेत. तसेच भिवंडी, ठाणे तालुक्यात एकही जण सध्या पर्यायी जागेवर राहत नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.

अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तालुक्यातील उल्हास व काळू नदी पत्राच्या शेजारील गावातील स्थलांतरित झालेल्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

घोडबंदर भागात वाहतूक कोंडी

मागील २४ तासांत झालेल्या २१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे; परंतु या पावसामुळे घोडबंदरचा मार्ग अडविल्याचे दिसून आले. चेणा नदीचे पाणी रस्त्यावर आले होते, तर गायमुख भागातही पाणी रस्त्यावर आल्याने येथील वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसून आले. एकूणच येथील रस्त्याला सकाळच्या सत्रात नदीचेच स्वरूप आले होते. त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला होता.

उपवन तलाव ओव्हरफ्लो

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ठाण्यातील आकर्षणाचे एक केंद्र असणारा उपवन तलाव ओव्हरफ्लो झाला. दोन दिवसांत तब्बल ३१५ मिलिमीटर पाऊस पडल्याने तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील बरेचशा तलावांत मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला आहे. उपवन तलावाच्या ओव्हर फलो झालेल्या पाण्यात ठाणेकरांनी भिजून मनसोक्त आनंद घेतला असल्याचेही दिसून आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com