रिया चक्रवर्तीच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी, आजची रात्रही भायखळा तुरुंगात

पूजा विचारे
Thursday, 10 September 2020

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने विशेष न्यायालयात बुधवारी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या जामीनावर आज सुनावणी झाली.  मात्र उद्या पुन्हा या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

मुंबईः  अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं मंगळवारी अटक केली. त्यानंतर रियाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. बुधवारी रियाची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करत असताना ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर चौकशी दरम्यान रियाचं नाव पुढे आलं आणि त्यानंतर एनसीबीनं ही मोठी कारवाई केली. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकने विशेष न्यायालयात बुधवारी जामीनासाठी अर्ज केला होता. त्या जामीनावर आज सुनावणी झाली.  मात्र उद्या पुन्हा या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.त्यामुळे रियाला आजची रात्रही भायखळा तुरुंगात काढावी लागणार आहे.

आज विशेष न्यायालयानं दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या. यावेळी संपूर्ण चौकशीशिवाय आरोपींना मोकळं सोडता येणार नसल्याचं एनसीबीनं न्यायालयाला सांगितलं. आजच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं दुपारच्या जेवणाची सुट्टी देखील नाकारली. l

दरम्यान  तपास यंत्रणांना ती पूर्णपणे सहकार्य करीत असून तिच्यावर दाखल आरोप जामीनास पात्र आहेत, असे अर्जामध्ये म्हटलं आहे.  तर कोणत्याही प्रकारचे अंमलीपदार्थ तिच्याकडे सापडले नाही आणि त्याचा वापर करण्याबाबतही तपास यंत्रणेकडे स्पष्टता नाही, त्यामुळे तिला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्य अटक आरोपींनी तिचा उल्लेख केला आहे आणि सुशांतला देण्यासाठी तीने अंमलीपदार्थ मागविले होते असा आरोप एनसीबीने तिच्यावर ठेवला आहे. याप्रकरणी ती निर्दोष असून तिला नाहक गुंतविण्यात आले असल्याचंही अर्जात म्हटलंय.

रियाला मंगळवारी दुपारी एनसीबीकडून अटक करण्यात आली. अटकेनंतर रियाला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. 

रविवारपासून सलग तीन रियाची चौकशी करण्यात आली होती. तीन दिवस चौकशी केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिला अटक केली. तीन दिवस एनसीबीनं रियाची जवळपास १५ तास चौकशी केली. 

रियाला एनसीबीनं कलम २७ (अ) अंतर्गत अटक केलीय. ड्रग्स तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा गुन्हाही तिच्यावर दाखल आहे. त्यानुसार १० वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद असेल, अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही. रियाच्या आधी तिचा भाऊ शौविक याला अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक केली. 

Riya and Shauvik Chakraborty bail application heard tomorrow Special Court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riya and Shauvik Chakraborty bail application heard tomorrow Special Court