रस्ते अपघातांत पादचारीच अधिक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

वाहतूक पोलिसांचा अहवालातून समोर आली माहिती.

मुंबई : मुंबईतील रस्ते अपघातांत 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 22 टक्‍क्‍यांनी घट झाली; मात्र अपघातात दगावलेल्यांमध्ये 51 टक्के पादचारी होते. यात वयोवृद्धांचे प्रमाण अधिक होते. 

वाहतूक पोलिसांनी "ब्लूमबर्ग फिलानथ्रोपिस'च्या सहकार्याने गुरुवारी जाहीर केलेल्या सुरक्षा अहवालात हे नमूद आहे. "ब्लूमबर्ग' 2015 पासून मुंबईत रस्ते सुरक्षेसाठी काम करते. 2017 मध्ये मुंबईत रस्ते अपघातांत 490 नागरिकांचा मृत्यू झाला. 2018मध्ये हा आकडा 475 होती. पादचाऱ्यांखालोखाल रस्ते अपघातांत दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. 2018 मध्ये दुचाकी अपघातांत 41 टक्के मृत्यू झाले. त्यात 28 टक्के दुचाकीचालक, तर 13 टक्के मागे बसलेल्या व्यक्ती आहेत. मुंबईतील रस्ते अपघातांतील 274 मृत व्यक्ती 15 ते 44 वयोगटातील होते. 

रस्ते अपघातांचे प्रमाण अधिक असलेले ब्लॅकस्पॉट ओळखणे, हेल्मेट योग्य पद्धतीने घालणे, वाहनाची गती व मद्यपी चालकांवर कारवाई यामुळे मुंबईतील रस्ते अपघातांतील मृतांच्या संख्येत घट झाल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. अपघातांपैकी 49 टक्के अपघात तीनचाकी व चारचाकी वाहनांच्या धडकेने झाले. तीनचाकी व चारचाकी वाहनांमुळे झालेल्या अपघातांमध्ये मृत झालेल्या व्यक्तींमध्ये पादचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. 

हेल्मेटबाबत जागृती 

मुंबईत 2015 मध्ये हेल्मेट वापरण्याचे प्रमाण 68 टक्के होते. ते 2018 मध्ये 92 टक्‍क्‍यांवर पोचले आहे; पण त्यापैकी 43 टक्के व्यक्तीच योग्य पद्धतीने हेल्मेट घालतात. मागे बसलेल्यांपैकी केवळ एक टक्का व्यक्ती हेल्मेट घालतात. हेल्मेट योग्य पद्धतीने घालण्याचे प्रमाण 24 वरून 34 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. 
 

हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढवले आहे. ट्‌विटर व इतर विविध मार्गांनीही याबाबत जनजागृती केली आहे. आम्ही इतर यंत्रणांशीही योग्य समन्वय साधल्याने अपघातांमध्ये घट झाली आहे. 
- मधुकर पांडे, सहपोलिस आयुक्त (वाहतूक) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: in road accident most are Pedestrians