कशेडी घाटात रस्ता खचला

देवेंद्र दरेकर
मंगळवार, 30 जुलै 2019

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कशेडी घाटातही हे काम सुरू असून भोगाव येथे रस्ता खचला आहे. याबाबत भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत रस्ता सातत्याने खचत आहे. जमिनीत पाणी मुरले असल्याने हा भाग कमकुवत झाला आहे. 

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भोगाव येथे 100 मीटर परिसरातील रस्ता एक-दीड फुटाने खचला आहे. तो दरीकडे सरकला आहे. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पावसाळ्यात हा रस्ता खचण्याचे दुखणे गेल्या 25 वर्षांपासूनचे असून पाच वर्षांत तो अधिक धोकादायक झाला आहे. 

महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. कशेडी घाटातही हे काम सुरू असून भोगाव येथे रस्ता खचला आहे. याबाबत भूगर्भ तज्ज्ञांकडून पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत रस्ता सातत्याने खचत आहे. जमिनीत पाणी मुरले असल्याने हा भाग कमकुवत झाला आहे. 

100 मीटरचा भाग दरीच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे, असेही त्यांनी सांगितले. 

दरम्यान, रस्ता खचल्याची माहिती मिळताच पोलादपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत जाधव, तहसीलदार प्राजक्ता घोरपडे, नायब तहसीलदार समीर देसाई, सरपंच राकेश उतेकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 
 
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात रविवारी रस्ता खचला. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. पोलिस गस्त घालत आहेत. सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. 
- प्रशांत जाधव, पोलिस निरीक्षक, पोलादपूर 

कशेडी घाटात दरवर्षी रस्ता खचतो. त्यामुळे मुंबईहून कोकणात जात असताना भीती वाटते. त्यामुळे प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. 
- विजय पवार, वाहनचालक 

कशेडी घाटात खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याची जबाबदारी रिलायन्स कंपनीची आहे. युद्धपातळीवर हे काम करण्यात येणार आहे. 
- प्रकाश गायकवाड, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Road Damaged in kashedi