राजकीय हेतूपोटी पक्षांतराच्या अफवा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑगस्ट 2019

राष्ट्रवादी आणि अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्याचा विचार कधीही केलेला नसताना राजकीय हेतूपोटी माझ्याबद्दल पक्षांतराच्या अफवा पसरविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

अलिबाग : राष्ट्रवादी आणि अध्यक्ष शरद पवार यांना सोडण्याचा विचार कधीही केलेला नसताना राजकीय हेतूपोटी माझ्याबद्दल पक्षांतराच्या अफवा पसरविण्यात येत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी दिली. गुरुवारी सकाळपासून सुनील तटकरे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त होते. याचे तटकरे यांनी खंडन केले आहे.

सुनील तटकरे हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे खासदार झाले आहेत. असे असतानाही व्हायरल झालेल्या वृत्तावरून जिल्ह्यात चर्चेला उधाण आले; मात्र हा सर्व प्रकार खोडसाळ असून, बदनामीसाठी केलेला उपद्‌व्याप आहे. रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनीही यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे.

तटकरे यांच्यासोबत आपण या विषयावर बोललो असून, ते सध्या दिल्लीत आहेत. मजबुतीने, विचाराने, सिद्धांताने आपल्याला यापुढेही शरद पवार यांच्यासोबत काम करायचे आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करता येईल का, याची चाचपणी करणार, अशी प्रतिक्रिया तटकरे यांनी दिली.

वडवलीचा सर्वांगीण विकास करणार
लोणेरे : खासदार आदर्श ग्राम योजनेंतर्गत खासदार सुनील तटकरे यांनी वडवली गाव दत्तक घेतले. देशभरात आदर्श गाव बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा आदिती तटकरे, वडवली सरपंच प्रियांका रूपेश नाक्ती, उपसरपंच दीपक कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष महंमद भाई मेमन, तालुकाध्यक्ष दर्शन विचारे, रायगड जिल्हा युवा उपाध्यक्ष अफजल मेमन, युवा अध्यक्ष सिद्धेश कोसबे, रमेश घरत, प्रवीण पवार, तहसीलदार जयराज सूर्यवंशी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rumoring in political parties