S.T कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील प्रलंबित गुन्हे निकाली काढा; विभाग नियंत्रकांना सूचना 

प्रशांत कांबळे
Tuesday, 12 January 2021

एसटी महामंडळातील अधिकारी तसेच वर्ग-3, वर्ग-4 प्रवर्गातील कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रलंबित असणाऱ्या अपराध प्रकरणांचा एका महिन्याच्या आत निपटारा करण्याच्या सूचना कर्मचारी व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत

मुंबई  : एसटी महामंडळातील अधिकारी तसेच वर्ग-3, वर्ग-4 प्रवर्गातील कर्मचाऱ्यांविरुद्ध प्रलंबित असणाऱ्या अपराध प्रकरणांचा एका महिन्याच्या आत निपटारा करण्याच्या सूचना कर्मचारी व औद्योगिक संबंध महाव्यवस्थापकांनी दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात अपराध प्रकरण निपटारा महिना उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रलंबित 22 हजार 398 प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. 

महामंडळातील कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील अपराध प्रकरणे, प्रथम अपील निकाली काढण्याच्या यापूर्वी अनेक वेळा सूचना दिल्या आहेत; मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने एसटी महामंडळ प्रशासनाने राज्यातील विभाग नियंत्रकांना फटकारले आहे. त्यानंतर आता पुन्हा कालबद्ध कार्यक्रम तयार करून प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एसटी महामंडळाने विभाग नियंत्रकांना सूचना दिल्या आहेत. प्रलंबित प्रकरणांची संख्या वाढली आहे. महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी तसेच वर्ग-3 व 4 प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध आतापर्यंत सुमारे 22,398 अपराध प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे अशा प्रलंबित अपराध प्रकरणांचा त्वरेने निपटारा करण्यासाठी 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत अपराध प्रकरण निपटारा महिना राबविण्याच्या सूचना महामंडळाने दिल्या आहेत. यासंदर्भात काटेकोर अंमलबजावणी न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा महामंडळ प्रशासनाने दिला आहे. 

 

असे चालणार कामकाज 
- सर्व सक्षम प्राधिकाऱ्यांद्वारे प्रलंबित अपराध प्रकरणांचा व प्रलंबित अपील प्रकरणांचा आढावा घ्यावा 
- कार्यवाही करताना कार्यालयाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार गैरकृत्याचे वर्गीकरण "अ', "ब' व "क' असे करावे 
- प्राधान्याने "क' वर्गातील अपराध प्रकरणांचा निपटारा करावा. "ब' व "अ' वर्गाची प्रलंबित अपराध प्रकरणांचा त्वरेने निपटारा करावा 

S T employees, resolve pending offenses against officers Notice to Department Controller

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: S T employees, resolve pending offenses against officers Notice to Department Controller

टॉपिकस
Topic Tags: