esakal | राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे.

राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल 

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबई- कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमानं घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. कोरोना व्हायरसचा सामना जगभरात सुरु आहे. संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. या संकटाचा सामना करताना अनेक राज्यकर्त्यांना आपलं पद सोडावं लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक अग्रलेखात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. आजच्या रोखठोकमध्ये संजय राऊतांनी लसीवरुन असलेल्या राजकारणाविषयी तसंच कोरोना रुग्णांच्या संख्येत देश कोणत्या स्थानवर पोहोचला या आणि अशा अनेक विषयांवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार? असा थेट सवाल त्यांनी आज उपस्थित केलाय. 

भारत देश कोरोना रुग्ण संख्येत तिसऱ्या क्रमांकावर 

आपल्या देशात कोरोनाची नेमकी स्थिती काय आहे हे आता लाख आणि कोटी अशा आकडय़ांत सांगायची गरज नाही. उत्तर सोपे आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत आपण जगात तिसऱया क्रमांकावर पोहोचलो आहेत. या स्पर्धेत तरी आपण रशियाला मागे टाकले आहे. तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या आणि पहिल्या क्रमांकावर पोहोचायला वेळ लागणार नाही अशी स्थिती सरळ दिसतंय, असं म्हणत राऊतांनी चिंता व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदी यांनी कोरोना संकट सुरू होतानाच सांगितले होते की, कोरोनाचे संकट हे युद्ध आहे. हे युद्ध आपण जिंकू. महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले. कोरोनाचे युद्ध एकवीस दिवस चालेल. पण विजय आपलाच आहे!, त्या युद्धाचे शंभर दिवसांनंतर काय झाले यावर पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगायला हवे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

लसीवरुन राजकारण 

त्या ‘लस’ प्रकरणाचेही राजकारण सुरू झाले आहे. लस शोधल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांना स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून करायची आहे, अशा थेट शब्दात त्यांनी मोदींना टोला हाणला आहे. 

कोरोना संकट हाताळण्यात कमी पडले म्हणून राज्यकर्त्यांना पद सोडावं लागलं. आपल्याकडील राज्यकर्त्यांना ते कधीच जमणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.  लडाखच्या सीमेवर 20 हिंदुस्थानी जवानांचे मरण (हौतात्म्य) का ओढवलं आणि त्यांच्या बलिदानास जबाबदार कोण हे कोणी ठरवायचं?, असा सवालही केंद्र सरकारला विचारला आहे. 

भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याबद्दल केंद्रात आणि राज्यातील अनेक मंत्र्यांना कायमच घरी जावे लागले. त्यात काही मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. पण महामारी, युद्ध, घुसखोरी, कोलमडलेली अर्थव्यवस्था, बेरोजगाराशी लढण्यात आलेले अपयश, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणारा महात्मा आपल्या देशात जन्माला यायचा आहे, हे नमूद करायला राऊत विसरले नाहीत.

saamana rokhtok sanjay raut pm modi  government corona virus india