नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची सुरक्षा रामभरोसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वेस्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे; मात्र नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची पाहणी केली असता येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. 

नवी मुंबई : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रेल्वेस्थानकांवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे; मात्र नवी मुंबईतील रेल्वेस्थानकांची पाहणी केली असता येथील सुरक्षा रामभरोसे असल्याचे समोर आले आहे. 

नवी मुंबईतील वाशी ते पनवेल या हार्बर मार्गावर व वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर एकाही रेल्वेस्थानकावर धातूशोधक यंत्रे आणि सामान तपासणी यंत्रणाच उपलब्ध नाही. तसेच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभारण्यात आलेले बंकरही गायब असून, जिथे आहेत तिथे कुत्र्यांचा रहिवास असल्याचे पाहावयास मिळत आहे. काही ठिकाणी पान-तंबाखू खाऊन त्यांचा पिकदाणी म्हणून वापर केला जात आहे. स्थानकांवर रेल्वे सुरक्षा बल (आरएसपी) आणि रेल्वे पोलिसांचीही गस्त नियमितपणे होत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. 
नवी मुंबई शहरातील सिडकोने भव्य रेल्वेस्थानकांची निर्मिती केली. यातून दररोज हजारो रेल्वे प्रवाशी प्रवास करतात. मात्र दोन्ही मार्गांवर येणाऱ्या ११ रेल्वेस्थानकापैकी एकही स्थानक असे नाही की ते सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण आहे. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांची गस्तही तुटपुंजी आहे. वाशी स्थानकाच्या प्रवेशद्वारावर दोन बंकर आहेत; पण ते कुत्र्यांचे झोपण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच स्थानकात चारही दिशांतून ये-जा करण्यासाठी प्रवेश असल्याने भविष्यात घातपात घडला तर जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थितीत होत आहे.

घातपात झाल्यानंतर यंत्रणा उभी करण्यापेक्षा आधीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. स्थानकात प्रवेशासाठी कसलीही तपासणी होत नसून, रेती भरलेले बॅंकर्स मात्र शोभेचे ठरू लागले आहेत.
- चंदन देसाई, रेल्वे प्रवासी, जुईनगर.

रेल्वे प्रशासनाने सावधगिरी म्हणून चोख सुरक्षा वाढवावी; तसेच चोवीस तास सुरक्षा रक्षक स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ तैनात करावेत.
- सीमा तिवारी, रेल्वे प्रवासी, वाशी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safety of railway stations in Navi Mumbai is unconcerned