

Traditional Salt Pan Industry in Crisis: Polluted Creek Water Destroying Salt Quality
Sakal
विरार : एके काळी मीरा भाईंदर ते डहाणू पर्यंतच्या परिसरात मिठागराचा मुख्य धंदा होता. या मिठागरात मिळणाऱ्या पैशावर आठ महिने येथील लोकांना रोजगार मिळत होता. तर उरलेले चार महिने भट शेतीवर निभावून जात असत. परंतु काळ बदलत गेला आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारची मीठ आल्याने मिठागरात पिकवलेल्या मिठाची मागणी कमी झाली. हाच पारंपरिक मीठ व्यवसाय सध्या मोठ्या संकटात सापडला असून खाडीत मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्यामुळे मिठागरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एकेकाळी मोठ्या प्रमाणात मीठ उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील मिठागरे आता ओस पडू लागली आहेत. मागील दोन ते चार वर्षांपासून खाडीच्या पाण्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मीठ उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून अनेक उत्पादकांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पारंपरिक उद्योगावर उपजीविका अवलंबून असलेल्या कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.