संघर्ष समिती निवडणुकीच्या रिंगणात

नरेश पवार : सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 19 September 2019

पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. 

पेण : पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराविरोधात लढा देणाऱ्या संघर्ष समितीने विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले असून पेण, अलिबाग, कर्जत आणि उरण मतदारसंघात संघर्ष समितीच्या वतीने उमेदवार उभे करण्यासाठी चाचपणी सुरू आहे. 

पेण अर्बन बॅंकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या सुमारे ७५८ कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यामुळे रायगड जिल्ह्यासह मुंबईमधील सुमारे दोन लाख ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पेण अर्बन बॅंक संघर्ष समितीची स्थापना झाली. समितीने त्यानंतर अनेक आंदोलने केली. न्यायालयीन लढाईहीसुद्धा सुरू आहे. 
समितीच्या म्हणण्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने ठेवीदारांना आश्वासने दिली होती. ती पूर्ण केली नाहीत. शिवसेना, भाजप सरकारनेही त्याच्याप्रमाणेच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे समितीने या फसवणुकीविरोधात विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. 
पेण अर्बन बॅंकेचे सुमारे दोन लाख ठेवीदार आहेत. यामध्ये पेण, कर्जत, उरण  आणि अलिबाग मतदारसंघात सर्वाधिक ठेवीदार आहेत. त्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी या  ठिकाणी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे, अशी माहिती पेण अर्बन बँक संघर्ष समितीच्या सूत्रांनी दिली. 

निवडणुकीवर बहिष्कार घालून काहीही निष्पन्न होत नाही. बहिष्कार राजकारणी आणि कर्जबुडव्यांच्या पथ्यावर पडतो. कर्जबुडव्यांना राजकीय आश्रय मिळतो. ठेवीदार मात्र देशोधडीला लागत आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने अनेक चांगले निर्णय दिले आहेत; मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत ठेवीदारांना निवडणुकीत उभे करण्याचा निर्णय संघर्ष समितीने घेतला आहे.
- नरेन जाधव, कार्याध्यक्ष, पेण अर्बन बॅंक संघर्ष समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangharsh Samittee election