esakal | शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, फडणवीसांच्या निर्धारावर राऊतांचा टोला
sakal

बोलून बातमी शोधा

शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, फडणवीसांच्या निर्धारावर राऊतांचा टोला

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर राऊतांनी फडणवीसांना दिले आहे.

शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, फडणवीसांच्या निर्धारावर राऊतांचा टोला

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य  महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना प्रत्त्युत्तर केले आहे. शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर राऊतांनी फडणवीसांना दिले आहे. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

बुधवारी मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित केलं.  कार्यकारिणीच्या बैठकीतून भाजपच्या मिशन मुंबईची  घोषणा करण्यात आली. २०२२ मध्ये मुंबई महापालिकेवर भगवा फडकणारच, मात्र भाजपचा भगवा फडकणार असं रोखठोक वक्तव्य फडणवीसांनी कार्यकारिणी बैठकीत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधताना केलं. फडणवीसांनी महाराष्ट्रातील तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारला अनेक मुद्द्यांवरून खडेबोल सुनावलेत. यामध्ये कोरोना, आरे मेट्रो, बुलेट ट्रेन , कोस्टल रॉड आदींचा समावेश होता.

काय म्हणाले संजय राऊत 

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते असल्यानं त्यांनी अशी भूमिका घेणं त्यांच्या पक्षासाठी बरोबरच आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध असल्याचं जर  भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनताच घेईल. महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई शहर आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा-  रायगडमध्ये २४ तासात नऊ दुचाकी, तीन मिनीबस जळून खाक

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा घाट सुरु असल्याचं म्हणत राऊत यांनी भाजपची सत्ता आल्यास हे नक्की होईल, असा दावाही त्यांनी केला आहे. गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईतील उद्योजकांना आपल्या राज्यात बोलावतात. याविरोधात भाजपचा एकही नेता बोलत नाही, पण शिवसेनेचे नेते बोलतात, असंही राऊत म्हणालेत. 

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस

नवीन टीमच्या माध्यमातून मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार याचा व्यक्त विश्वास फडणवीसांना व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपचं मिशन मुंबई सुरु झालं. देशात कोरोनाच्या सर्वाधित केसेस महाराष्ट्र आणि मुंबईत का ? देशातील सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्या लोकांमध्ये ४० टक्के लोकं महाराष्ट्रात का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाने मृत्यू झालेत. दुर्दैव म्हणजे कोरोनाच्या काळात प्रेताच्या टाळूवरच लोणी या सरकारने खाल्लं, असंही ते म्हणाले.

Sanjay Raut attack on decision of Devendra Fadnavis