Sanjay Raut ED : दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडल्या? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Sena leader Sanjay Raut
Sanjay Raut ED Live Updates: पत्नीसह संजय राऊतांची ईडीकडून चौकशी

Sanjay Raut ED : दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडल्या? वाचा सविस्तर

आम्ही ईडी किंवा सरकारसमोर झुकणार नाही - विनायक राऊत

ईडीने संजय राऊतला अटक केली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आम्ही ईडी किंवा सरकारसमोर झुकणार नाही. आम्ही शिवसेनेसाठी लढत राहू. आम्हाला त्यांचा (संजय राऊत) अभिमान आहे, त्यांना महाराष्ट्रातील जनतेचा पूर्ण पाठिंबा आहे असे शिवसेना खासदार विनायक राऊत म्हणाले आहेत.

राऊतांच्या घरातून ११.५० लाख रुपये जप्त

ईडीने केलेल्या छापेमारीत आज अंमलबजावणी संचालनालयाने संजय राऊत यांच्या घरातून 11.50 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.


संजय राऊत ईडी कार्यालयाच्या टेरेसवर

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर ते ईडी कार्यालयाच्या इमारतीच्या टेरेसवर दिसून आले.

 हे सर्व शिवसेना-महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी होतंय - राऊत

लोकांवर खोटे आरोप आणि कागदपत्रे तयार केली जात आहेत. हे सर्व शिवसेना आणि महाराष्ट्राला कमकुवत करण्यासाठी केले जात आहे. संजय राऊत खचून जाणार नाही. मी पक्ष सोडणार नाही, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले आहेत.

राऊतांवर चित्रा वाघ यांची खोचक टीका, म्हणाल्या

ईडीकडून संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे, त्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी "रावण दुर्योधन आणि राऊत... यांच्या पतनाला दोन सामायिक कारणे जबाबदार आहेत… एक कारण स्त्रीची अवहेलना … आणि दुसरे कारण सत्तेचा माज..." अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

 ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांचं ट्वीट..

संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी ट्वीट केलं आहे, या ट्वीटमध्ये त्यांनी "आप ऊस व्यक्ती को नहीं हरा सकते.. जो कभी हार नहीं मानता! झुकेंगे नही! जय महाराष्ट्र" असे म्हटले आहे.

  पत्रा चाळ कुठे आहे, मला माहिती नाही - संजय राऊत

ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की, कोणत्याही कागदपत्रे माझ्याकडे सापडलेले नाही. शिवसेना तोडायची, मोडायची. उद्धव ठाकरेंना कमजोर करण्याचा प्रयत्न असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. कारवाईला घाबरत नाही, कोणती पत्रा, चाळ कुठे आहे? मला माहिती नाही. शिवसेनेला व महाराष्ट्राला लढण्याचा बळ मिळत असेल तर बलिदान द्यायला तयार आहे. बदल्याच्या भावनेने कारवाई केली जात आहे. उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी माझ्यावर कारवाई केली जात आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

संजय राऊतांना घेऊन ईडीची टीम रवाना 

मुंबईतील त्यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना ताब्यात घेतलं. यावेळी घटनास्थळी उपस्थित शिवसेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. संजय राऊत यांनी ईडीने ताब्यत घेतले असून त्यांना कार्यलयात नेण्यात येत आहे.

नवाब मलिक यांचे शेजारी होणार संजय राऊत -किरीट सोमय्या

केवळ राजकीय पक्षांवरच कारवाई होते असे नाही - केसरकर

त्यांच्यावर कुठली कारवाई किंवा अटक व्हावी अशी मागणी आम्ही केलेली नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेली भेटीचा कारवाईशी काही संबंध नाही त्यांना अटक झालेली नाही, होईल की नाही माहिती नाही, ही कारवाई त्यांच्या कडे असलेले पुराव्यावरून होत आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध नाही, मुद्दाम असे गैर समाज पसरवले जात आहेत, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.

केवळ राजकीय पक्षांवरच कारवाई होते असे नाही, त्यांची बाजू खरी असेल तर कारवाईच होणार नाही. तसेच आदित्य ठाकरे माझ्या मतदार संघात जात आहे, अमूक ठिकाणी रहा किंवा सभेला जाऊ नका असे सांगितलेले नाही, त्यामुळे मला जे बालयाच त्यावर सुद्धा बंधन राहणार नाही, असेही केसरकर म्हणाले.

मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात

पत्रा चाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. आज सकाळी त्यांच्या घरावर ईडीच्या पथकाने छापा मारला होता. तेव्हापासून त्यांची चौकशी केली जात आहे.

 राऊतांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे

संजय राऊतांना आज कदाचीत अटक होण्याची शक्यता आहे, आज त्यांनी रोखठोक केलं आहे. हे कारस्थान निर्लज्जपणे चाललं आहे असा हल्लाबोल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे, आज सकाळपासून ईडीकडून शिवसेना नेते संजय राऊत यांची चौकशी सुरु असून त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

'पवारांना काळजी सेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार'

उध्दव ठाकरेंना काळजी - अटक झाली तर मुलाखत कोणाला देणार? पवारांनाही काळजी - शिवसेनेत राहून राष्ट्रवादीची भांडी कोण घासणार?; अतुल भातखळकर यांनी राऊतांच्या चौकशीवरुन टोला लगावला आहे.

ईडीला घाबरून कुणीही आमच्याकडे येऊ नये - मुख्यमंत्री शिंदे

ईडीला घाबरून कुणीही आमच्या गटाकडे किंवा भाजपकडे येऊ नये असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे. आम्हाला अशा लोकांना पक्षात घ्यायचं नाही असं त्यांनी सांगितलं आहे.

'ED ला राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा वाचवला'

अपेक्षेप्रमाणे ईडी नावाचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी भल्या पहाटे दाखल झाले आणि एक हाती किल्ला लढवणाऱ्या व प्रत्येकवेळी शिवसेनेसोबत एकनिष्ठ असणाऱ्या शिवसैनिकावर कारवाई सुरु केली. आज अनेक आत्मे आतून सुखावले असतील . राउत इडीला घाबरून भाजपला शरण गेले नाहीत. राज्यपालाच्या कालच्या वक्तव्यावरील गदारोळाला थांबविण्याकरता भाजपाने ची ही नवी खेळी . आज ईडीचे पाहुणे संजय राऊत यांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

ईडी कारवाई कोणावर होते अन् कोणावर होत नाही,हे सगळं महाराष्ट्र पाहतोय. राजकारणात अनेक वेळा आरोप केले जाता,गाडीभर पुरावे अन गाडी कोणीच पोहचले नाहीज पण ईडी कारवाईत काही निष्पन्न होत नाही. मलिक व देशमुख यांच्यातून काय समोर आलं? यामुळे कुटूंबीयावर परिणाम होतो, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

राऊतांची चौकशी, CM शिंदेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मुंबईत सध्या मोठी कारवाई सुरू आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न विचारला असता, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आता आपल्याला त्यापेक्षा महत्त्वाची कारवाई करायचीये विकासकामाच्या प्रकल्पाची. आणि अशा रितीने शिंदेंनी थेट उत्तर देणं टाळलं आहे.

चौकशीदरम्यान राऊतांचं खिडकीतून शिवसैनिकांना अभिवादन

मैत्री बंगल्यावर ईडीची कारवाई सुरू असताना संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी खिडकीत येऊन शिवसैनिकांना अभिवादन केले

राऊतांवरच्या कारवाईवर अजित पवारांची सावध प्रतिक्रिया; "या यंत्रणांना..."

या यंत्रणांना तपासाचा अधिकार आहे, त्यानुसार ते तपास करतायत. सगळ्या विविध विभागांमध्ये तक्रारी आल्या तर चौकशीचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीत आहे. आता हे नक्की काय झालंय, पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे का येतात, ते अधिकारवाणीने राऊतच सांगू शकतात. या यंत्रणांना देशातल्या कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे.

राऊतांच्या घराबाहेरचा बंदोबस्त वाढवला; अटकेचे संकेत?

संजय राऊत यांच्या घराबाहेरच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. तसंच ईडी कार्यालयाबाहेरचा बंदोबस्तही वाढवला आहे. त्यामुळे आता संजय राऊत यांच्या अटकेची तयारी ईडीकडून करण्यात येत असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा भाग - शंभूराज देसाई

या केंद्र सरकारच्या यंत्रणा - त्यांना त्यांचे अधिकार आहेत. आधीही ईडीकडून नोटिसा देण्यात आल्या होत्या. पण त्यांना हवी ती माहिती कदाचित मिळाली नसेल, त्यामुळे आता ते तपास करत असतील. मला या प्रकऱणात अधिक माहिती नाही. या यंत्रणा स्वायत्त आहेत, त्यांना त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर या तपासात काही आढळलं नाही तर ते तपास थांबवतात. पोलीस यंत्रणा किंवा केंद्रीय यंत्रणा असतील, ते खोलात जाऊन काम करत असतात. काही सत्य नसेल तर संजय राऊतांनी खऱ्या बाजू समोर आणाव्यात. राऊत रोज सकाळी बोलायचे, सामनातून बोलायचे, जसं की यांनाच सगळं माहित आहे देशातलं.

रोज आमची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ खराब झाली याचं समाधान - नितेश राणे

रोज आमची सकाळ खराब करणाऱ्याची सकाळ खराब झाली याचं समाधान आहे. या महाशयांना ईडीने आधीही अनेकदा समन्स बजावलं होतं. पण ते चौकशीसाठी आलेच नाही. तुम्ही जर चूक केली नाही, तर न घाबरता उत्तर द्यावं. ज्या अर्थाने हे पळत होते. दिल्लीवरुन यायलाच तयार नाही. ट्वीट करणं सोपं असतं, जेव्हा मलिक आणि देशमुखाांच्या बाजूला बसून शिवथाळी खाण्याचे दिवस येतील तेव्हा कळेल, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणेंनी दिली आहे.

संजय राऊतांच्या घरासह इतर दोन ठिकाणी ईडीची शोधमोहीम सुरू आहे. ईडीच्या एकूण तीन पथकांसह जवळपास २५ अधिकारी तपास करत आहेत.

संजय राऊतांना हिशोब द्यावा लागणार - किरीट सोमय्या

मी ईडीच्या कारवाईचं स्वागत करतो. संजय राऊतांचा हिशोब द्यावा लागणार. १२०० कोटींचा पत्राचाळ घोटाळा असो, किंवा माफियागिरी असो. आज महाराष्ट्राची जनता अत्यंत आनंदी आहोत. पण संजय राऊतांना हिशोब द्यावा लागणार.

राऊतांवरच्या कारवाईमुळे आम्ही आनंदी - संजय शिरसाट

संजय राऊतांवरच्या कारवाईवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या कारवाईमुळे आम्ही आनंदी असल्याचंही शिरसाट म्हणाले आहेत. राऊतांच्या भोंग्यामुळे शिवसेना फुटली असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे. पवारांच्या नादी लागून त्यांनी वाटोळं करुन घेतलं, असंही शिरसाट म्हणाले आहेत. तसंच त्यांच्या अटक होण्याची शक्यता जास्त आहे, असंही ते म्हणाले.

तरीही शिवसेना सोडणार नाही - संजय राऊत

तरीही शिवसेना सोडणार नाही.महाराष्ट्र आणि शिवसेना लढत राहील. खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय. मी शिवसेनेसाठी लढत राहीन. जय महाराष्ट्र, असं ट्वीट ईडीची चौकशी सुरू असतानाच संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी सकाळीच ईडीचं पथक दाखल झालं आहे. पत्राचाळ प्रकरणात सध्या राऊतांची त्यांच्या भांडूपमधल्या मैत्री या घरी चौकशी केली त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. सध्या संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा आणि बंधू सुनील यांच्यासह ही चौकशी सुरू आहे. दरम्यान,यावेळी त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमले होते.

टॅग्स :Sanjay Raut