रोखठोक : संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार काय करणार खुलासा...

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 जुलै 2020

शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे.

 

मुंबई- विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. लवकरच ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

'टाटा' समूहाची ठाकरे सरकारला अशीही मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

आतापर्यंत राऊत यांनी शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती.

आता सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत असेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील, असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. सामनामध्ये लवकरच या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणारेत. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

दमदार पावसाचा मुंबईकरांना फायदा, तलावांच्या पाणीसाठ्यात झाली मोठी वाढ

'देशाचे नेते शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडींपर्यंत शरद पवार जोरदार बोलले. ही मुलाखत लवकरच प्रसिद्ध होणार आहे', असे राऊत यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.

संजय राऊत आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. महाराष्ट्रात आणि देशात सध्या अनेक घटनांची चर्चा होत आहे. चीनपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अशा विविध विषयांवर शरद पवार यांनी आपली भूमिका संजय राऊत यांच्यासोबतच्या मुलाखतीत मांडली. शरद पवारांनीही अतिशय मोकळेपणानं आपले विचार मांडले असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता या मुलाखतीतील गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut, Executive Editor of 'Saamana' has interviewed NCP President Sharad Pawar.