संजय राऊतांचा शरद पवारांना 'तो' रोखठोक सवाल, दुसरा प्रोमो रिलीज

पूजा विचारे
Friday, 10 July 2020

आज या मुलाखतीचा दुसरा प्रोमो संजय राऊतांनी शेअर केला आहे. यामध्येही संजय राऊतांच्या रोखठोक  प्रश्नांना शरद पवारांनी दिलाखुलास उत्तरं दिल्याचं पाहायला मिळतंय. 

मुंबई- शिवसेनेचे संसदीय नेते आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. लवकरच ही मुलाखत प्रसारित होणारेय.  ही मुलाखत  राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या मुलाखतीचे प्रोमो संजय राऊत आपल्या ट्विटरवर शेअर करत आहेत. आज या मुलाखतीचा दुसरा प्रोमो संजय राऊतांनी शेअर केला आहे. यामध्येही संजय राऊतांच्या रोखठोक  प्रश्नांना शरद पवारांनी दिलाखुलास उत्तरं दिल्याचं पाहायला मिळतंय. 

काय आहे दुसऱ्या प्रोमोमध्ये 

दुसऱ्या प्रोमोमध्ये शरद पवार हे भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांविषयी भाष्य करत असल्याचं दिसतंय. विधानसभा निवडणुकीत भाजपल्या मिळालेल्या 105 जागांमध्ये शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. मात्र त्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवारांना एक असा प्रश्न विचारला आहे की, जो प्रश्न संपूर्ण राजकारणांना जनतेला पडला आहे. 'ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?' असा थेट प्रश्न राऊतांनी शरद पवारांना मुलाखतीत विचारला. त्यानंतर लगेचच प्रोमो संपताना दिसतो. त्यामुळे या प्रश्नावरील उत्तर मुलाखतीचा संपूर्ण भाग प्रसारित झाल्यानंतरच पाहायला मिळेल. 

 

येत्या ११ जुलैपासून, म्हणजेच उद्यापासून शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'तून ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार आहे. 11, 12 आणि 13 जुलै रोजी या मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होतील. सामना वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांवर ही मुलाखत प्रसिद्ध होईल. पहिल्या प्रोमोमध्ये कोरोनाचा सुरू असलेला प्रादुर्भाव ते राम मंदिर पर्यंतच्या प्रश्नांवर शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 

अधिक वाचा-  कोरोनाच्या संकटात पालिकेसोबत हातमिळवणी करा, मुख्यमंत्र्यांनी कोणाकडे मागितली मदत 

मुलाखतीसंबंधी ट्विटरवर दिली होती माहिती 

संजय राऊतांनी  शरद पवार यांची मुलाखत घेतली असल्याची माहिती ट्वीटरवरून  दिली होती. शरद पवारांनीही अतिशय मोकळेपणाने आपले विचार मांडले असंही संजय राऊत यांनी म्हटलं. देशाचे नेते शरद पवार यांच्याशी दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल..शरद पवार यांनी चीनपासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले, असं ट्विट त्यांनी केलं होतं. 

हेही वाचाः आता 'या' रुग्णालयातही कोरोना चाचणी होणार; मुंबई पालिकेचा कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर

संजय राऊत आणि शरद पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आता या मुलाखतीतील गौप्यस्फोटांना शरद पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

sanjay raut interview ncp chief sharad pawar second promo out


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut interview ncp chief sharad pawar second promo out