मुंबई - नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथे बुधवारपासून (ता.12) चेतक महोत्सव सुरू होत आहे. सारंगखेडा येथे भरणाऱ्या घोड्यांच्या पारंपरिक बाजाराला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या चेतक महोत्सवाची जोड मिळाल्यापासून यंदाही या महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाच्या माध्यमातून देश-विदेशांतील पर्यटकांना या भागात आकर्षित करून उत्तर महाराष्ट्राच्या पर्यटन विकासाला चालना देण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी दिली.
रावल आणि पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांच्या प्रमुख उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. घोड्यांच्या बाजारासोबत शस्त्रास्त्र प्रदर्शन, घोड्यांच्या स्पर्धा, पेंटिंग स्पर्धा, फोटो प्रदर्शन, घोडेस्वारी, टेंट सिटी, लावणी महोत्सव, कव्वाली महोत्सव यासारखे अनेक कार्यक्रम होणार आहेत. 8 जानेवारी 2019 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी महोत्सवास भेट द्यावी, असे आवाहन रावल यांनी केले आहे.
|