महाडमध्‍ये खवले मांजर वाचवण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 ऑक्टोबर 2019

महाड शहरातील तांबडभुवन येथील नागरिकांना आढळलेले खवले मांजर सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी पकडून सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात दिले आहे.

महाड (बातमीदार) : महाड शहरातील तांबडभुवन येथील नागरिकांना आढळलेले खवले मांजर सिस्केप संस्थेच्या सदस्यांनी पकडून सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात दिले आहे. मोठ्या प्रमाणात तस्कारी होत असलेल्या या प्राण्याला सुरक्षित केल्याबद्दल सिस्केपचे कौतुक होत आहे. 

सध्या खवले मांजराची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. खेड, श्रीवर्धन, पोलादपूर येथील तस्करांच्या टोळीला मुंबई आणि स्थानिक पोलिसांनी ताब्यातही घेतलेले आहे. भारतीय वाघा इतकाच कडक संरक्षित वर्ग १ अ अशी १९७२ वन्यजीव संरक्षण कायदा संमत नोंद असलेला खवले मांजर बाळगणे, वाहतूक करणे वा इतर कोणत्याही प्रकारे त्याची तस्करी किंवा शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. असे हे खवले मांजर शुक्रवारी सायंकाळी महाडमधील तांबडभुवन परिसरात नागरिकांनी पाहिले. त्याला पकडणे शक्‍य नसल्याने सिस्केप संस्था सदस्य योगेश गुरव, चिंतन वैष्णव, ओम शिंदे आणि चिराग मेहता यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी या खवले मांजराला पकडून महाड वन विभागाचे वनपाल पी. डी. जाधव आणि विजयकांत पवार यांच्या ताब्यात पुढील देखरेख आणि वैद्यकीय तपासणीसाठी सुपूर्द केले. पुढील तपासणी महाड वन विभाग वनक्षेत्रपाल प्रशांत शिंदे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एस. सोनावले यांनी सिस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री, सदस्य प्रीतम सकपाळ, सह्याद्री मित्रचे अध्यक्ष डॉ. राहुल वारंगे, अमोल वरांगे, शलाका आणि मुक्ता वारंगे आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या खवले मांजराला सुरक्षित ठिकाणी पुन्हा निसर्गात सोडण्याची कार्यवाही महाड वन विभाग करणार आहे. वेगवेगळ्या भौगोलिक कारणांमुळे खवले मांजर जंगलातून स्थलांतरीत होत आहेत. महाडमध्ये खवले मांजर सापडण्याची ही पाचवी वेळ आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save Khawale Manjar in Mahad