रस्त्यावरील दिव्यांमुळे 'या' पालिकेची झाली लाखोंची बचत 

दीपक शेलार
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

ठाणे पालिकेने शहरातील जुनाट लोखंडी विद्युत खांबांसह सोडियम व्हेपरचे पथदिवे हटवून नवीन एलईडी दिवे बसवून विजेची आणि विद्युत बिलाचीही बचत केली आहे. शहरातील निम्म्याहून अधिक भागात एलईडी दिवे बसवण्यात आल्याने रस्ते एलईडी दिव्यांनी उजळले आहेत.

ठाणे : वाढत्या महागाईची झळ सर्वसामान्यांसह सरकारी संस्थांनादेखील बसत आहे. या पार्श्‍वभूमीवर दैनंदिन खर्चात बचत करण्याकडे सर्वांचाच कल दिसून येतो. त्यानुसार, वीज बचतीच्या उपाययोजना राबवण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या ठाणे पालिकेने शहरातील जुनाट लोखंडी विद्युत खांबांसह सोडियम व्हेपरचे पथदिवे हटवून नवीन एलईडी दिवे बसवून विजेची आणि विद्युत बिलाचीही बचत केली आहे. शहरातील निम्म्याहून अधिक भागात एलईडी दिवे बसवण्यात आल्याने रस्ते एलईडी दिव्यांनी उजळले आहेत.

विशेष म्हणजे अशा प्रकारे एलईडी दिवे बसवणारी ठाणे महापालिका महाराष्ट्रात पहिली असल्याचा दावा महापालिकेच्या विद्युत विभागाने केला आहे. ठाणे महापालिका विद्युत संवर्धन मोहिमेत नेहमीच अग्रेसर राहिली असून त्याकरिता पालिकेस वेळोवेळी विविध राज्यस्तरीय, तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. या उपाययोजनांचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाने रस्त्यावर सोडियम व्हेपर दिव्यांऐवजी एलईडी पथदिवे बसवण्याचे आदेश पालिकेच्या विद्युत विभागाला दिले होते.

त्यानुसार, कुठलाही भांडवली व महसुली खर्च न करता एस्को प्रकल्पांतर्गत महापालिका क्षेत्रात एलईडी दिव्यांचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. 2013 पासून आजपर्यंत एकूण 40 हजार 885 सोडियम व्हेपर दिव्यांपैकी 28 हजार 300 एलईडी दिवे बसवण्यात आले आहेत. 

एलईडी दिव्यांचा वीज खर्च सोडियम दिव्यांच्या तुलनेत निम्मा येतो. एक वर्षात सुमारे अडीच हजार दिवे लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर जमिनीत पुरलेले जुनाट लोखंडी (एमएस) खांब हटवून नवीन गॅल्वनाइजचे खांब विशेष कॉंक्रीट बेस बनवून त्यावर फिट करण्यात आल्याने विद्युत खांब कोसळण्याचा धोका कमी झाला आहे. शिवाय या नवीन खांबांच्या आतच विद्युत सर्किट बसवलेले असल्याने लोखंडी खांबावरील सर्किट बॉक्‍सची अडचण उद्‌भवणार नाही. 

रस्ते, उड्डाणपूल वाढूनही खर्च निम्मा 
राज्यातील सर्व शहरांसाठी दिव्यांच्या प्रकाशाच्या प्रखरतेबाबतची मानके तयार करण्यात आली आहेत. या निकषानुसार दिव्यांच्या प्रकाशाची प्रखरता ही 30 मानके असणे आवश्‍यक आहे. एलईडी दिव्यांची प्रखरता 50 मानके एवढी आहे. त्यामुळे, एलईडी दिवे सर्वच बाबतीत उपयुक्त ठरत आहेत. वीज बचतीच्या उपाययोजनांसाठी अग्रेसर असलेल्या महापालिकेने पूर्वीच्या सोडियम व्हेपर पथदिव्यांच्या जागी एलईडी दिवे बसवले आहेत.

यामुळे वीज वितरण खर्च कमी होऊन वीज बिलातही मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. पूर्वी ठाण्यात रस्त्यांची संख्या कमी असताना 23 कोटी वीज बिल येत असे. आता नवीन रस्ते, तसेच उड्डाणपूल वाढले असूनही अवघे 17 कोटी बिल येत आहे. तुलनेने हा खर्च निम्मा असल्याचे पालिकेचे विद्युत अभियंता विनोद गुप्ता यांनी सांगितले. 

चंदेरी प्रकाशाची झळाळी 
नौपाडा-कोपरी प्रभाग समितीअंतर्गत ठाणे पूर्वेकडील रस्त्यांवर एलईडी दिवे बसवले आहेत. स्थानिक शिवसेना नगरसेविका नम्रता पमनानी यांच्या पाठपुराव्याने एलईडी दिव्यांसह रस्त्यावरील विद्युत खांबदेखील नव्या स्वरूपातील बसवण्यात आले आहेत. त्यामुळे, वीजबचतीसह शहराला चंदेरी प्रकाशाची झळाळी मिळाली आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Save millions due to street lights