esakal | शाळाबाह्य मुलांची भरतेय पदपथावर शाळा| सामाजिक जाणिवेतून 36 मुलांना शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

शाळाबाह्य मुलांची भरतेय पदपथावर शाळा| सामाजिक जाणिवेतून 36 मुलांना शिक्षण

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या आणि पदपथांवर वास्तव्यास असणाऱ्या मुलांसाठी माटुंगा पूर्वेला अनोखी शाळा भरू लागली आहे.

शाळाबाह्य मुलांची भरतेय पदपथावर शाळा| सामाजिक जाणिवेतून 36 मुलांना शिक्षण

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई  : आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दुरावलेल्या आणि पदपथांवर वास्तव्यास असणाऱ्या मुलांसाठी माटुंगा पूर्वेला अनोखी शाळा भरू लागली आहे. सामाजिक जाणिवेतून वेलिंगकर इस्टिट्यूटजवळील पदपथावर ओपन एज्युकेशन या नावाने रोज दुपारी 3 ते 5 या वेळेत शाळा भरू लागली आहे. येथे लॉकडाउनमध्ये ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिलेले आणि शाळाबाह्य झालेले अडीच ते आठरा वर्षांपर्यंतचे 36 विद्यार्थी शिक्षण घेउ लागले आहेत. या शाळेत दिव्यातून भाउ बहिण शिक्षणासाठी खडतर प्रवास करत येत आहेत. 

बीएससीनंतर फॅशन डिजाईनचे शिक्षण घेतलेल्या मीनल सोनावणे यांच्या कल्पनेतून गेली 11 दिवसापासून ही शाळा भरू लागली आहे. या शाळेत माटुंगा, वडाळा, किंग्ज सर्कल, माहिम येथे पदपथावर वास्तव्यास असलेले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येउ लागले आहेत. यातील बहुतांश मुले ही पेपर आणि प्लास्टिक विकणारे आहेत. शिकण्याची इच्छा असतानाही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे यातील अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. या विद्यार्थ्यांना बेसिक इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यात येत आहे. या शाळेसाठी दादर परिसरातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी मदत केली. मुलांसाठी आवश्‍यक शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव करत या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे. शिक्षणाची गोडी लागलेली ही मुले हातची कामे बाजूला टाकून शाळेत हजेरी लावू लागले आहेत. 
शिक्षणाची ओढ लागल्याने विद्यार्थी दुपारी 2 वाजताच येथे जमू लागले आहेत. वडाळा, किंग्ज सर्कल, माहिम या भागातूनही विद्यार्थी येथे येउ लागले आहेत. दोन तासाच्या या शाळेत विद्यार्थ्यांना अधिकाधिक शिक्षण देण्याचा प्रयत्न मीनल सोनावणे, वेदका, ओमकार बोरकर, अनामिका बोरकर, आनंद प्रभू, मितेश खाडे आणि मयुर सारंग हे करत आहेत. या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आल्या आहेत. तसेच ही शाळा पाहून विविध ठिकाणचे लोकही या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावू लागले आहेत. 

मुंबई, रायगड ठाणे परिसरातील महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी क्लिक करा

दहावीच्या तीन विद्यार्थ्यांना शिक्षण 
दहावी इयत्तेत असलेल्या परंतू मोबाईल फोन नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिलेल्या तीन विद्यार्थ्यांना रस्ते की पाटशालामध्ये शिक्षण देण्यात येत आहे. या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने हे विद्यार्थी आतापर्यंत अभ्यासापासून दूर होते. दहावीचे अर्ज भरण्यासही या विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने मीनल यांनी या विद्यार्थ्यांचा परीक्षा अर्ज स्वखर्चाने भरला आहे. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे, सोनावणे यांनी सांगितले. 

शिक्षणासाठी दिवा ते माटुंगा प्रवास 
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षण घेउ शकत नसलेले अनाथ भाउबहिण खडतर प्रवास करत शिक्षणासाठी दररोज मुंबईत येउ लागले आहेत. दिवा स्टेशनपासून एक तास लांब राहत असलेले हे भाउ बहिण चालत रेल्वे स्टेशनपर्यंत येतात. तिथून ते रेल्वेने माटुंगा येथे येउन शिक्षण घेउन पुन्हा घरी परतत आहेत. रूपेश सिंग असे पाचवी वर्गात असलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून शिक्षण अपूर्ण राहिलेल्या बहिनीचे नाव रूपाली सिंग आहे. वयानुसार आता ती दहावीत असायला हवी, होती असे सोनावणे यांनी सांगितले. 

रूईया महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आजूबाजूला पदपथांवर राहणाऱ्या मुलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. मनसेच्या मदतीमुळे आता मुलांना माझे स्वप्न दृष्टीपथात आले आहे. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण द्यावे, त्यांना नोकरी लावावी यासाठी प्रयत्न करणार आहे. यासोबतच मुलांच्या आईवडिलांसाठी विविध प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. 
- मीनल सोनावणे -
ओपन एज्युकेशनच्या प्रकल्प प्रमुख

School on the footpath for out of school children Educating 36 children through social awareness

----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )