दसऱ्यानंतर KEMमध्ये स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस

भाग्यश्री भुवड
Sunday, 25 October 2020

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड -19 बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीचा दुसरा डोस येत्या सोमवारपासून केईएमच्या स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. 

मुंबई: ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविड -19 बहुप्रतिक्षित लसीच्या चाचणीचा दुसरा डोस येत्या सोमवारपासून केईएमच्या स्वयंसेवकांना दिला जाणार आहे. 

दसऱ्यानंतर केईएम रुग्णालयातील स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार, ही चाचणी नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या किंवा तिसऱ्या पूर्ण होईल. त्यानंतर, त्या स्वयंसेवकांचा 4 महिन्यांचा पाठपुरावा केला जाईल. या अभ्यासाचा संपूर्ण कालावधी सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021 पर्यंत असणार अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली आहे. 

आतापर्यंत केईएममध्ये 100 जणांना डोस देण्यात आला आहे. त्याच स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 

अधिक वाचा-  चला आजपासून व्यायामाला करा सुरुवात; जिम, व्यायामशाळा सुरु

26 सप्टेंबरपासून किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात सुरूवात झाली. चाचण्यांच्या पहिल्याच दिवशी 20 ते 45 वयोगटातील तीन स्वयंसेवकांना दुसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्यांचा भाग म्हणून इंट्रामस्क्युलर डोस दिला गेला. त्यानंतर, 28 सप्टेंबर या दिवशी नायरमध्ये देखील 3 स्वयंसेवकांना कोव्हिशिल्डची लस देण्यात आली.

अधिक वाचा-  शिवसेनेचा आज दसरा मेळावा, मुख्यमंत्री कोणाकोणावर बाण चालवणार?

या मानवी चाचणीला वेग आला असून गेल्या 22 दिवसांत दोन्ही रुग्णालयांमध्ये 160 हून अधिक स्वयंसेवकांना कोव्हिशील्ड लसीचा डोस देण्यात आला आहे. केईएम रुग्णालयात आतापर्यंत 100 जणांना तर, नायरमध्ये 60 हून अधिक स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा डोस देण्यात आला आहे. दरम्यान, केईएम रुग्णालयातील 100 स्वयंसेवकांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस सोमवारपासून दिला जाईल. 

केईएममध्ये सोमवारपासून दुसरा डोस

केईएममध्ये ज्या स्वयंसेवकांना कोविशील्डचा डोस देण्यात आला त्यांचा 28 दिवसांचा कालावधी आता पूर्ण झाला आहे. त्यामुळे, सोमवारपासून त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. आतापर्यंत 100 जणांना डोस देण्यात आला आहे. शुक्रवारपासून डोस देण्यात येणार होता. पण, दसरा असल्यामुळे त्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत वेळ घालवायचा आहे. म्हणून सोमवारपासून दुसरा डोस दिला जाईल असे केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

----------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Second dose of covishield be given volunteers KEM after Dussehra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Second dose of covishield be given volunteers KEM after Dussehra