कोरोनाचा परिणाम पुढच्या पिढीवरही; कोरोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक

मिलिंद तांबे
Tuesday, 1 December 2020

काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून ती अधिक पसरण्याची शक्यता आहे.

मुंबई, ता. 1 : युरोपातील काही देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून ती अधिक पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट पुढच्या वर्षातही कायम राहण्याची शक्यता असून याचे दुष्परिणाम लहान मुलांवर होण्याची भिती युनिसेफने व्यक्त केली आहे. कोरोनाचा प्रभाव असाच कायम राहिल्यास एका संपूर्ण पिढीचे भविष्य धोक्यात येईल असे ही त्यांनी पुढे म्हटले आहे. 

युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडने अर्थात युनिसेफने भारतासह एकूण 140 देशांमध्ये पाहणी केली आहे. कोरोना साथीत मुलांसाठी धोका कमी होण्याऐवजी वाढला असून जागतिक साथीमुळे अनेक देश आर्थिक संकटात सापडले असल्याचेही या पाहणीतून पुढे आले आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेचा भारतासारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या देशाला अधिक बसण्याची शक्यता असल्याचे ही त्यांली पुढे म्हटले आहे.

महत्त्वाची बातमी : सत्तेसाठी मूळ विचारांना शिवसेनेची तिलांजली, अजान स्पर्धेवरुन दरेकरांची टीका

कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण तसेच आरोग्याशी निगडित सेवांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केले तर जवळपास 20 लाख मुलांचा पुढील 12 महिन्यांमध्ये मृत्यू होण्याचा धोका आहे. तसेच कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे तरुण पिढीची काम करण्याची क्षमता कमी होऊ शकते, असा इशाराही युनिसेफने दिला आहे.

140 देशांमध्ये केलेल्या पाहणी अहवालात सध्याच्या पिढीसमोर तीन प्रकारचे धोके दिसून आले आहेत. या धोक्यांमध्ये कोरोना साथीचे परिणाम, आवश्यक सेवांमध्ये पडलेला खंड आणि वाढती गरिबी आणि विषमतेचा समावेश करण्यात आला आहे. वाढती गरिबी ही लहान मुलांसमोरील सर्वात मोठे संकट असल्याचे अहवालात म्हटले आहे.

जगातील एकतृतीयांश देशातील आरोग्य सेवांमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. संसर्गाच्या भीतीमुळे ही घट झाली असून नियमित लसीकरण, बाह्यरुग्णांची केली जाणारी देखभाल, लहान मुलांना होणारा संसर्ग, गर्भवती महिलांसाठीची आरोग्य सेवा यावर याचा परिणाम झाला असल्याचे युनिसेफने म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

second wave of covid19 is harmful for next generation says UNICEF


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: second wave of covid19 is harmful for next generation says UNICEF