esakal | चपलामुळे उघड झाले प्रेमीयुगुलाचे गुपित 
sakal

बोलून बातमी शोधा

चपलामुळे उघड झाले प्रेमीयुगुलाचे गुपित 

मुलगी आपल्या अल्पवयीन प्रियकराला घेऊन निघाली होती भुवनेश्‍वरला 

चपलामुळे उघड झाले प्रेमीयुगुलाचे गुपित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दहीकाल्याच्या पूर्वसंधेला ठाणे रेल्वे स्थानकात दोन संशयित बुरखाधारींना पकडण्यात आले होते. यावेळी यातील एक पुरुष असल्याचे उघडकीस आल्याने स्थानकात खळबळ उडाली; मात्र पुढील चौकशीत ते दोघेही प्रेमीयुगुल असल्याचे समोर आले. दरम्यान, हा सर्व प्रकार एका चपलामुळे उघडकीस आला असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 

एका प्रेमीयुगुलाने घरातून पलायन केल्यानंतर कुणी ओळखू नये यासाठी बुरखा धारण केला होता. दरम्यान, या वेळी मुलाच्या पायातील चप्पल पुरुषी वाटल्याने पोलिसांनी त्यांची अधिक तपासणी केली, ज्यात ते दोघेही प्रेमीयुगुल असून घरातून पळून आल्याचे समोर आले. ते दोघेही उच्चशिक्षित असून अंबरनाथ येथून पळून आले होते. तसेच ते स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी भुवनेश्‍वर येथे जाण्याच्या तयारीत होते, अशीही माहिती पोलिसांनी दिली. 

शुक्रवारी (ता. 23) रात्री ठाणे रेल्वे स्थानकात संशयास्पद स्थितीत आढळलेल्या दोन बुरखाधारींना लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. गस्तीवरील पोलिसांना बुरखाधारींपैकी एकाच्या पायात पुरुषी चप्पल दिसून आल्याने त्यांची तपासणी केली असता हा बुरखाधारी चक्क पुरुष असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले असता बुरखा परिधान केलेले दोघेही प्रेमीयुगुल असल्याचे समोर आले. ज्यातील मुलगा संगणक अभियंत्याचे शिक्षण घेत असून मुलगीही नीट परीक्षेची तयारी करीत आहे.

दरम्यान, दोघेही आपली सर्व शैक्षणिक कागपत्रे घेऊन भुवनेश्‍वर येथे आपल्या पायावर उभे राहण्यासाठी निघाले होते; मात्र कल्याण येथे गाडी चुकल्याने दोघेही ठाणे स्थानकात आले होते. विशेष म्हणजे मुलगा अल्पवयीन असून मुलगी 18 वर्षांची आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांकडे त्यांच्या पालकांचे नंबर मागितले असता त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडील बॅगेतील कागदपत्रांवरून नंबर मिळवून त्यांच्या पालकांशी संपर्क साधला आणि दोघांनाही पालकांच्या स्वाधीन केले. 

दोघांकडेही अवघे वीस रुपये 

पायातील चपलामुळे बिंग फुटलेले हे प्रेमीयुगुल अवघे 20 रुपये घेऊन भुवनेश्‍वरला जात होते. संबंधित माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली. या वेळी मुलाकडे अवघे 20 रुपये आणि मोबाईल फोन होता; तर मुलीकडे मोबाईलदेखील नव्हता. विशेष म्हणजे खर्चासाठी मिळणाऱ्या पैशांतून त्यांनी बुरखा खरेदी केला होता. 
 
 

loading image
go to top