मोरबे धरणावर विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

मोरबे धरणातील विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या विसर्ग असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जाळी नसल्याने, पर्यटक पाण्याच्या प्रवाहात पडून जीवितहानी होण्याची घटना घडू शकते. त्यामुळे धरणाच्या विसर्ग परिसरात सुरक्षेसाठी संरक्षक जाळी बसवावी. तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा. अशी मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे कर्जत येथे मोरबे धरण आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून, धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा धरणातील विसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, या विसर्ग असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक जाळी नसल्याने, पर्यटक पाण्याच्या प्रवाहात पडून जीवितहानी होण्याची घटना घडू शकते. त्यामुळे धरणाच्या विसर्ग परिसरात सुरक्षेसाठी संरक्षक जाळी बसवावी. तसेच पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा. अशी मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केले आहे.

मोरबे धरणाचा विसर्ग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक धरणावर जात आहेत. विसर्गाच्या ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह पर्यटकांना होत असून, सेल्फी काढत असताना एखादा पर्यटक पडून जीवितहानीदेखील होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक जाळी लावण्यात यावी; तर अनेक पर्यटक हे मद्यपान करून, धरणावर असलेल्या सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या पर्यटकांना आवर घालणे सुरक्षा कर्मचाऱ्यांना जड जात आहे. त्यामुळे धरणाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष पाटील यांनी या वेळी केली.

मोरबे धरणावर पाण्याच्या विसर्गाच्या ठिकाणी सुरक्षा जाळी नसल्यामुळे येणारे पर्यटक फोटो काढण्याच्या मोहाने प्रवाहात पडून जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा जाळी किंवा भिंत उभारण्यात यावी; तसेच सुरक्षा रक्षकांसह पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात यावा.
- विजय पाटील, अध्यक्ष, कर्मचारी अधिकारी संघटना, नवी मुंबई महापालिका.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To see nature at Morbe Dam Crowds of tourists