बाजारपेठांमधली गर्दी पाहून दिवाळीत पालिकेसमोर कोविड रोखण्याचे आव्हान

मिलिंद तांबे
Thursday, 12 November 2020

गणेशोत्सावानंतर वाढलेल्या रुग्णसंख्येतून बोध न घेता दिवाळीच्या खरेदीसाठी सरकारी नियमावलीचे पालन न करता नागरिक बाजारापेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. पालिकेने कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने अनेक उपायोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी स्वत: स्वयं शिस्तीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे.  

मुंबई: कोविड आजार जणू शहरातून हद्दपार झाल्याच्या आवेशात नागरिक   दिवाळीनिमित्त खरेदीसाठी गर्दी करू लागलेत. गणेशोत्सावानंतर वाढलेल्या रुग्णसंख्येतून बोध न घेता दिवाळीच्या खरेदीसाठी सरकारी नियमावलीचे पालन न करता नागरिक बाजारापेठांमध्ये गर्दी करू लागले आहेत. मात्र यामुळेच पालिकेसमोर कोविड रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. पालिकेने कोविड रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने अनेक उपायोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी स्वत: स्वयं शिस्तीने वागण्याची गरज निर्माण झाली आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास डिसेंबरमध्ये येणारी कोरोनाची दुसरी लाट टाळणे अशक्य असल्याचे आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

गणेशोत्सवानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली होती. सध्या पालिकेने केलेल्या उपायोजना केल्याने काही अंशी रुग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र दिवाळीसाठी नागरिकांनी खरेदीसाठी अक्षरशः नागरिकांची झुंबड उडाली आहे. कपडे, पूजेचे साहित्य खरेदी, फुले खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीने मंड्या बहरल्या आहेत. मात्र यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अगदी कोरोना गेल्या प्रमाणे लोक वावरत आहेत. सुरुवातीच्या काळात मास्क, सॅनिटायझर सारख्या गोष्टी हिरीरीने वापरणारे नागरिक आणि दुकानदार नियमावलीचे उल्लंघन करण्यात धन्यता मानू लागलेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्यासोबत दुसरी लाट येण्याची शक्यता डॉ. भोंडवे यांनी बोलून दाखवली आहे.

गणशोत्सवानंतर आकडे वाढले ही परिस्थिती पुन्हा उद्भवू शक्यते. दिवाळीसोबत वाढणारी थंडी ही कोरोना रुग्णांसाठी घातक ठरू शकते. त्यामुळे यंदा नागरिकांनी फटाके उडविणे टाळावे. सध्या थंडीचा तडाखा वाढत असून प्रदूषण जमिनी लगत असल्याने न्यूमोनियासारख्या आजाराला आमंत्रण मिळू शकते. तसेच फटाक्याच्या धुराने प्रदुषणाची पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या आणि त्यावेळी व्हेंटीलेटर, आयसीयू आणि ऑक्सिजनची गरज लागलेल्या रुग्णांना त्रास होऊ शकतो आणि परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी मास्क सॅनिटायझरसह सोशल  डिस्टन्सिंग दिसत पाळणे गरजेचे आहे असे डॉ भोंडवे सांगतात.

अधिक वाचा-  नितीशकुमारांची वरात काढून त्यात घोडे नाचवले जातील, सामनातून भाजपवर टीका

 

कोविड आजार फुफ्फुसाशी संबंधित असल्याने कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये श्वसनाची समस्या उद्भवू शकते. श्वास घेण्यास त्रास झाल्यास शरीरातील प्राणवायू पातळी कमी होते.  एवढेच नव्हे तर पाहुण्यांच्या घरी जाणे टाळावे,  दुसऱ्याच्या घरी गेल्यास घरात प्रवेश केल्यानंतर मास्कचा वापर करावा अशा सूचना तज्ज्ञ देत आहेत. जेणेकरून स्वतः आणि समोरची व्यक्ती सुरक्षित राहील. दिवाळीच्या खरेदीसाठी शक्यतो बाहेर पडू नये. गर्दीच्या वेळा आणि ठिकाणे टाळावीत. मनाने माणूस कितीही धीट असला तरीही जीवावर बेतण्याची स्थिती असताना तो जीवाचाच अधिक विचार करतो, याचा प्रत्यय कोरोना काळात आला आहे. मात्र अनलॉक होत असताना सण उत्सवांच्या उत्सवीकरणात सामील होताना त्याच जीवाची चिंता करू नये का? असा ही प्रश्न स्वत:ला विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळात वारंवार हात धुणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरण्याच्या सवयी कोरोना रुग्णसंख्या कमी होताच कमी होत आहेत असे दिसून येते. मे जून महिन्याच्या तुलनेत आता सोशल डिस्टंसिंगचे नियम तंतोतंत पाळताना दिसून येत नाही.

सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळण्याची आणि अनलॉक उघडताना सामाजिक जबाबदारी झिडकारण्याचे परिणाम सध्या युरोप खंडात दिसून येत आहेत. पाश्चात्य देशांतील नागरिकांनी जी चूक केली त्या चुकीची पुनरावृत्ती आपल्यासाठी जीवघेणी ठरू शकते. युरोप खंडाहुनही जवळ असलेल्या आपल्याच देशाची राजधानी दिल्लीत प्रदूषण आणि थंडी  वाढल्याने कोरोनाचा प्रभाव ही वाढलेला दिसून येतो. यातून धडा घ्यावा. सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात केलेल्या शिथिलीकरणाचा परिणाम सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दिसून आला. त्यावेळी नियम न पाळण्याने रोजची कोरोना नोंद 23 हजारावर गेली असल्याचे समोर आले. त्याचा ताप सरकारी  यंत्रणासह सामान्य लोकांना ही सहन करावा लागला. तरी आज ही काही जणांच्या व्हाटसअप चे स्टेटस दुसऱ्या लाटेची खिल्ली उडवताना दिसून येतात. दुसऱ्या लाटेसाठी येणारी थंडी आणि दिवाळी कारण होऊ शकते. कोणत्याही विषाणूला थंडीत जोर येत असतो.

अधिक वाचा-  कोरोनासाठी महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून कौतुक

दुसऱ्या लाटेसाठी येणारी थंडी आणि दिवाळी कारण होऊ शकते. कोणत्याही विषाणूला थंडीत जोर येत असतो. आज मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील ओपीडीत तापसरीचे रुग्ण वाढल्याचे आकडेवारी सांगते. म्हणजेच हिवाळ्यात सर्दी, खोकला ताप या सारखे विषाणूजन्य आजार वाढतच असतात. यातून संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात विषाणूला जोर कमी असतो.  सर्दी, पडसे, खोकला म्हणजेच नाक घसा या सारखी अंगे प्रभावित होत असतात. हीच अंगे विषाणूची आश्रय स्थाने असतात. मोसमातील सर्दी पडसे ताप कोणालाही होऊ शकतो. अशा पैकी 30 टक्के रुग्णांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यास गंभीर स्थिती आणू शकतो. त्यासाठी सावध होणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावण्यास मानवी शरीर हे माध्यम आहे. त्यात थंडी संसर्ग वाढण्यास पूरक ठरू शकते. त्यामुळे काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

पालिका पूर्ण तयारी निशी सज्ज असून सध्या सीसीसी मध्ये 80 टक्के बेड रिकामे आहेत. आयसीयूबेड ऑक्सिजनचा पुरवठा, चाचणी संख्या वाढविण्यावर भर दिलेला आहे. बिना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पालिकेने मार्शलची नेमणूक केलेली आहे. मात्र कारवाई पेक्षा नागरिकांनी स्वत: सरकारी निर्देशांचे पालन करून पालिकेला सहकार्य केल्यास कोरोनासाठी सज्ज केलेली यंत्रणा वापरण्याची गरज लागणार नाही.
सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

---------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Seeing the crowds markets challenge of stopping covid in front BMC on Diwali


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seeing the crowds markets challenge of stopping covid in front BMC on Diwali