लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन; रायगडमध्ये ऑनलाईऩ प्रक्रियेचा सावळा गोंधळ

प्रमोद जाधव
Saturday, 16 January 2021

सॉफ्टवेअरच्या ऑनलाईन प्रक्रीयेत बाधा निर्माण झाल्याने पेण व पनवेल या ठिकाणी लसीकरणाला दुपारी दीड वाजले तरीही सुरुवात झाली नाही.

अलिबाग - कोरोनावर मात करण्यासाठी रायगड जिल्हयात शनिवारी लसीकरणाचा शुभारंभ अलिबागसह, पेण व पनवेल या ठिकाणी करण्यात आला. परंतू सॉफ्टवेअरच्या ऑनलाईन प्रक्रीयेत बाधा निर्माण झाल्याने पेण व पनवेल या ठिकाणी लसीकरणाला दुपारी दीड वाजले तरीही सुरुवात झाली नाही. तसेच अलिबागमध्ये दुपारपर्यंत फक्त दहा जणांना लस देण्यात आली. यामुळे लसीकरणाच्या ऑनलाईन प्रक्रीयेचा सावळा गोंधळ जिल्हयात दिसून आला. मात्र दुपारी दीडनंतर ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करून लसीकरणाचे काम जिल्हयात सुरु केले. 

 रायगड जिल्हयासाठी सुमारे 9 हजार 500 इतकी कोरोनाची लस उपलब्ध झाली. गेल्या दोन महिन्यांपासून लस देण्याबाबत प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले.  लस देणाऱ्या लाभार्थींची नोंद प्रशासनाकडून करून लसीकरणाबाबत रंगीत तालीमही करण्यात आली होती. 16 जानेवारी रोजी जिल्हयातील अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, पेण येथील उपजिल्हा रुग्णालय, पनवेल तालुक्यातील कामोठे येथील एमजीएम रुग्णालय, तसेच खारघर येथील एरला मेडीकल ट्रस्ट याठिकाणी वैद्यकिय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन केले होते. लस देणाऱ्या लाभार्थींची माहिती शासनाच्या सॉफ्टवेअरमध्ये नोंदणी करण्यासाठी कोवीन अॅप सुरु करण्यात आले होते. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला दहा जणांचे लसीकरण्यात आले. परंतू या ऑनलाईन प्रक्रीयेमध्ये बाधा निर्माण झाल्याने अलिबागसह पेण, पनवेल व खारघर याठिकाणी लसीकरणाचे काम थांबले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत जिल्हयात फक्त दहा जणांना लस देण्यास आरोग्य विभागाला यश आले. ऑनलाईन प्रक्रीयेत नेट कनेक्टीव्हीची समस्या निर्माण झाल्याने लसीकरण लांबणीवर गेले होते. अखेर लस देणाऱ्या लाभार्थींची माहिती ऑफलाईन नोंदणी करून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. 

मुंबई रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

शासनाच्या कोवीन अॅपमध्ये लाभार्थीची नोंदणी केली जाते. त्यामध्ये सर्व माहिती घेतली जाते. लाभार्थ्याला मेसेज पोहचला जातो.त्यानंतर लसीकरणाचे काम सुरु केले जाते. परंतू या प्रक्रीयेत सुरुवातीला बाधा निर्माण झाली होती. नंतर वरिष्ठांच्या सुचनेनुसार ऑफलाईन नोंदणी करून लसीकरणाचे काम सुरु केले. 

डॉ. गजानन गुंजकर 
 निवासी वैद्यकिय अधिकारी

Server down on the first day of vaccination error in online process in Raigad

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Server down on the first day of vaccination error in online process in Raigad