शीव-पनवेल मार्गाच्या भुयारी मार्गात सांडपाणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

शीव-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्गांचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गात साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यता देखील व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई : शीव-पनवेल महामार्गावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत; मात्र या भुयारी मार्गांचे काम अर्धवट अवस्थेत ठेवण्यात आल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गात साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्‍यतादेखील व्यक्त केली जात आहे. 

या मार्गावरील सर्वच भुयारी मार्गांमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले असून, कचऱ्याचे आणि घाणीचे साम्राज्यदेखील वाढले आहे. या भुयारी मार्गामध्ये विद्युत रोषणाई नसल्याने भुयारी मार्ग खिंडर झाले आहे. या भुयारी मार्गांच्या पायऱ्यांवर गर्दुल्ल्यांचा वावरदेखील वाढला असून, या ठिकाणी मद्यपी देखील मद्यपान करत असतात. भुयारी मार्गात साचत असलेल्या पाण्यामुळे पादचाऱ्यांना नाइलाजास्तव जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे एखादी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सायन-पनवेल महामार्गाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०११ मध्ये ‘सायन-पनवेल टोलवेज प्राव्हेट लिमिटेड कंपनी’च्या माध्यमातून करण्यात आले. १ जानेवारी २०१५ मध्ये या रस्त्याचा टोल सुरू झाला. पण भाजप सरकारने टोलमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यांनतर सहा महिन्यांतच खासगी गाड्यांना टोल बंद करण्यात आला. तसेच कंत्राटदारांचे पैसे हे शासनाने दिले नसल्याने कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शासनाकडून कंत्राटदाराला पैसे मिळत नसल्याने काम ठप्प झाले आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

नेरूळ : 
सायन-पनवेल मार्गावरील नेरूळ उड्डापपुलाच्या खाली असणाऱ्या सर्कलच्या ठिकाणी दोन भुयारी मार्ग बांधण्यात आले आहेत. या भुयारी मार्गांमध्ये तीन फुटांपर्यंत पाणी साचले असून, त्यामध्ये डासांची पैदास झाली आहे. त्यामुळे रागरोई पसरण्याची शक्‍यता आहे. याशिवाय या भुयारी मार्गाचे गेटदेखील बंद करून ठेवण्यात आले आहे.

सीबीडी :
सीबीडी येथील एसबीआय कॉलनीजवळील भुयारी मार्गात तीन ते चार फुटांपर्यंत पाणी साचले आहे. याशिवाय भुयारी मार्गात अंधाराचे सम्राज्य पसरले असून, या मार्गांचा वापर मद्यपी मद्यपान करण्यासाठी करत आहेत. हा भुयारी मार्ग बांधण्यात आल्यापासून याचा कधी वापरच झाला नसल्याचे महिला प्रवासी प्राजक्ता काळे यांनी सांगितले.

उरण फाटा:
येथील भुयारी मार्गामध्ये अंधाराचे साम्राज्य असून, विद्युत रोषणाई नाही. साफसफाई करण्यात न आल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून, या मार्गाचा वापर गर्दुल्ले करतात.

पावसाळ्यामध्ये पाणी साचल्यामुळे तीन वेळा पाणी काढण्यात आले आहे. भुयारी मार्गात साचत असणारे पाणी हे पावसाचे नसून, भरती आल्यानंतर तसेच ड्रेनेजचे आहे. त्यामुळे पाणी काढल्यानंतर देखील पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी वॉटर पम्पिंग करण्यात येणार आहे. भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामांचे टेंडरदेखील काढण्यात आले आहे. त्यासाठी शासनाकडे पाठपुरावादेखील करण्यात आला आहे. लवकरच भुयारी मार्ग सुकर करण्यात येईल.  
- किशोर पाटील, अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sewage in the subway under Shiv-Panvel route