ऑस्ट्रेलियन गाईंच्या आधारे भिवंडीत दूधपुरवठा

प्रकाश परांजपे
Tuesday, 30 July 2019

शहापुरातील तरुणाने ऑस्ट्रेलियन गाईंच्या आधारे दुग्धव्यवसायात भरारी घेतली आहे...

शहापूर : मुंबई-नाशिक महामार्गापासून चार किमी अंतरावरील भातसा कालव्याजवळील माळरानात ऑस्ट्रेलियन गाई आणून ‘धवल क्रांती’ करण्याचे स्वप्न कुणी पाहू शकेल का? पण शहापुरातील एका तरुणाने ते पाहिले आणि प्रत्यक्षात उतरविले... प्रदीप आळशी असे या तरुणाचे नाव असून, त्यांच्या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. ऑस्ट्रेलियन गाईंच्या जीवावर दररोज ६०० लिटर दुधाचा पुरवठा त्यांनी भिवंडी शहरात सुरू केला आहे. 
 
१९८८ पासून रेती, खडी व डबर पुरवठा करण्याचा व्यवसाय चांगला सुरू होता; पण २०१५ मध्ये कडक नियमांमुळे तो करणे जिकिरीचे झाले. व्यवसाय बंद करण्याचा निर्णय प्रदीप यांनी घेतला. चेरपोलीचा मित्र दुधाचा व्यवसाय छोट्या प्रमाणात करत होता. त्यातील बारकावे प्रदीप यांनी समजून घेतले. प्रदीप यांनी गुजरातमधील मेहसाणा येथून सहा म्हशी आणल्या आणि शहापुरात तसेच अमूल डेअरीला नियमित दूध पुरवठा करू लागले. त्यांनी म्हशींची संख्या १० वर नेली. जोडीला ७५ ऑस्ट्रेलियन गाई आणल्या. त्या गाई दोन वर्षांच्या असतानाच २० लिटर दूध देऊ लागतात आणि त्यांचे आयुष्य २० ते २२ वर्षे असते; तर म्हशी १० ते १५ लिटर दूध रोज देतात. त्यांचे आयुष्य १८ ते २० वर्षे असते. त्यामुळे दररोज ६०० लिटर दुधाचा पुरवठा त्यांनी भिवंडी शहरात सुरू केला. 

उन्हाळ्यात ऑस्ट्रेलियन गायींना उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून शेडमध्ये पंखे लावण्यात आले आहेत. गायींना दररोज धुतले जाते. त्यांचे शेण तत्काळ हटवून एका ठिकाणी त्याचा साठा केला जात होता. आठवड्याला दोन ट्रक शेण नाशिकचे बागाईतदार घेऊन जातात. भविष्यात हा व्यवसाय मोठा करण्याचा मानस आहे. 
- प्रदीप आळशी, दुग्ध व्यावसायिक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shahapurs Youth Established His Milk Business With Australian cow's In Bhiwandi, Near Mumbai