शाहीर अमर शेख यांच्या साहित्याचे संकलन सुरू

श्रद्धा पेडणेकर
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

कवयित्री, कन्या मल्लिका अमर शेख यांच्यावर जबाबदारी

कवयित्री, कन्या मल्लिका अमर शेख यांच्यावर जबाबदारी
मुंबई - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शब्दांचा प्रहार करीत बुलंद आवाजात आंदोलन चेतवत ठेवलेल्या, गोवामुक्ती आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या आणि चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी देशप्रेमाचा अंगार पेटवून लाखोंचा निधी देशासाठी गोळा करणाऱ्या शाहीर अमर शेख यांच्या समग्र साहित्याचे आतापर्यंत संकलन झाले नव्हते. त्यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने लवकरच त्यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्यात येणार आहे. अमर शेख यांच्या कन्या, कवयित्री मल्लिका अमर शेख या साहित्याचे संकलन करत आहेत.

उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी ज्यांनी आपली वाणी वापरली, अशा या शाहिरांकडे व त्यांच्या साहित्याकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले होते. "कलश', "धरणीमाती' हे काव्यसंग्रह, "अमरगीत' हा गीतसंग्रह, "पहिला बळी' हे नाटक, शिवाजी महाराजांवर त्यांनी रचलेला तब्बल साडेतीन तासांचा पोवाडा, तसेच होळकर, उधम सिंग यांच्यावरील पोवाडे लवकरच नव्या पिढीसमोर येणार आहेत.

शाहीर अमर शेख यांच्या एकूण साहित्याची जुळवाजुळव झाली आहे. दोन महिन्यांत याचे संकलन करून साहित्य व संस्कृती मंडळाकडे दिले जाईल. आज लोककला, लोकचळवळींचा अभ्यास करताना शाहिरांच्या योगदानाचे मोल जाणावेच लागेल. त्यांचे साहित्य आतापर्यंत संकलित झाले नाही, ही शोकांतिका आहे. अभ्यासकांना, पुढच्या पिढीला एकूणच शाहिरांचे व्यक्तीत्व एकत्र समजावे, यासाठी हा ग्रंथ महत्त्वाची भूमिका निभावेल.
- मल्लिका अमर शेख, अमर शेख यांच्या कन्या.

Web Title: Shahir Amar Sheikh starting literature of the collection