शरद पवार म्हणतात 'हे जेवण आयुष्यभर लक्षात राहील'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

दौऱ्याचापाडा (ता. शहापूर) येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आदिवासी कुटुंबाच्या झोपडीत भोजनाचा आस्वाद घेतला.

शहापूर : दौऱ्याचापाडा (ता. शहापूर) येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आदिवासी कुटुंबाच्या झोपडीत भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी कुटुंबातील रामचंद्र खोकडा आणि कमल खोकडा यांची आस्थेवायिक चौकशी करत 'हे जेवण माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील', असे सांगत जेवणाचे कौतुक केले. 

शहापूर तालुक्‍यातील दौऱ्याचापाडा येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने कर्करोगग्रस्तांसाठी मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे विद्यासंकुल उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन गुरुवारी (ता. 30) पवार यांच्या हस्ते करण्यात आले. "जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थे'चे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्यावतीने शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत मिळावे यासाठी शहापूरमध्ये "केजी टू पीजी' असे सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रम एकाच छताखाली आणणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भव्य विद्यासंकुलाची उभारणी करण्यात येत आहे. तसेच झपाट्याने वाढणाऱ्या विविध आजारांचा विळखा लक्षात घेता गोरगरिबांना मोफत उपचार मिळावेत यासाठी 200 खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे. यात 100 खाटांचे मोफत कर्करोग मल्टिस्पेशालिटी आणि 100 खाटांचे जनरल मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येत आहे. 

ही बातमी वाचा ः पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसली जातेय का?

दरम्यान, पवार यांनी येथील प्राथमिक शाळेत भेट देऊन शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनीदेखील पवार यांच्याशी इंग्रजीमध्ये संवाद साधला. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा, आमदार दौलत दरोडा, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दशरथ तिवरे, विद्या वेखंडे, सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे, शिक्षक प्रमोद पाटोळे, ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य आदी उपस्थित होते. 

sharad pawar had food in the hut of adiwasi citizen at shahapur

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad pawar had food in the hut of adiwasi citizen at shahapur