esakal | "यापूर्वीचे निर्णयही नजरचुकीनेच घेतले असावेत"
sakal

बोलून बातमी शोधा

Jayant-Patil-PM-Modi

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी उडवली केंद्र सरकारची खिल्ली

"यापूर्वीचे निर्णयही नजरचुकीनेच घेतले असावेत"

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई: बचत योजनांमध्ये व्याजदर कपातीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अर्थ मंत्रालयाकडून तात्काळ तो आदेश मागे घेण्यात आला. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना झटका देत या योजनांमध्ये व्याजदर कपात जाहीर करण्यात आली होती. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी हा आदेश नजरचुकीने निघाल्याचे सांगत व्याजदर जैसे थे राहतील, असं स्पष्ट केलं. निर्मला सीतारमन यांनी केलेल्या या ट्वीटनंतर त्यांच्यावर टीकेचा भडीमार करण्यात आला. "भाजपचे सरकार प्रत्येक वेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. त्यामुळे यापूर्वीचे निर्णयदेखील असेच नजरचुकीने घेतले गेले असावेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

"भाजपचे सरकार प्रत्येक वेळी देशातील जनतेची थट्टा करत आले आहे. आज पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती झाली असून कोट्यवधी ठेवीदारांची केंद्र सरकारने थट्टा केली. नोटाबंदीपासून ते निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये प्रथम लसीकरण सुरू करण्यापर्यंत साऱ्या बाबींमध्ये सरकारने कोट्यवधी ठेवीदारांची मस्करी केली", असे जयंत पाटील यांनी ट्वीट केले. या ट्वीटसोबत त्यांनी नॅशनल जुमला डे असा हॅशटॅगदेखील पोस्ट केला.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील (पीपीएफ) व्याजदर ०.७ टक्क्याने कमी करून ६.४ टक्क्यांवर आणण्यात आला. पोस्टाच्या बचत खात्यावरील व्याज वार्षिक ४ वरून ३.५ टक्के, एक वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.५ वरून ४.४ टक्के, ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनांवरील व्याजदर ७.४ वरून ६.५ टक्के, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ६.८ वरून ५.९ टक्के, किसान विकासपत्रांवरील व्याजदर ६.९ टक्क्यांवरून ६.२ टक्के आणि सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ६.९ टक्के इतके कमी करण्यात आले होते. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी (१ एप्रिल ते ३० जून २०२१) हे नवे व्याजदर लागू राहतील असं सांगण्यात आलं होतं. पण हे नजरचुकीने झालं असं सांगून हे आदेश मागे घेण्यात आले.

loading image