दुसऱ्या पत्नीच्या वारसाला आर्थिक भरपाईमध्ये वाटा;  उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सुनिता महामुणकर
Saturday, 5 September 2020

राज्य रेल्वे पोलीस दलातील मृत पोलीस कोरोना योद्धाच्या आर्थिक भत्याची वाटणी पहिली पत्नी, तिची मुलगी आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलीमध्ये समान करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

मुंबई : राज्य रेल्वे पोलीस दलातील मृत पोलीस कोरोना योद्धाच्या आर्थिक भत्याची वाटणी पहिली पत्नी, तिची मुलगी आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलीमध्ये समान करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. मात्र दुसऱ्या पत्नीला यामध्ये वाटा मिळालेला नाही. 

मुंबईसह पालघरमध्ये भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये घबराट

एका पोलीस कर्मचाऱ्याचा 30 मे रोजी कोरोनामुळे मृत्यु झाला. या कर्मचाऱ्याला सरकारकडून 60 लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र ही मदत मिळण्यासाठी दोन महिलांनी पत्नी म्हणून अर्ज केला. तर दुसऱ्या पत्नी आणि मुलीने न्यायालयात याचिकाही केली. शुक्रवारी न्या. शाहरुख काथावाला आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे पहिली पत्नी, तिची मुलगी, दुसरी पत्नी आणि तिची मुलगी असे सर्व पक्षकार सुनावणीला हजर होते. खंडपीठाने आर्थिक भत्याचे वाटप, कायदेशीर प्रक्रिया यांची माहिती संबंधित पक्षकारांना दिली. तसेच सरकारकडून मिळणाऱ्या सुमारे 60 लाख रुपयांचे तीन समान भागात वाटप करून तिघींना देण्याचे निर्देश रजिस्ट्री कार्यालयाला दिले. ही रक्कम यापूर्वीच सरकारकडून न्यायालयात जमा करण्यात आली आहे. सर्व पक्षकारांनी यावर सहमती व्यक्त केली आहे. पोलीस असलेल्या कोरोना योद्धाचे दोन्ही विवाहांची नोंदणी झालेली नाही. पहिला विवाह 1992 मध्ये तर दुसरा विवाह 1998 मध्ये झाला होता. कायद्यानुसार पहिली पत्नी, तिची मुले आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलांना वडिलांच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मिळतो, असे मत खंडपीठाने मागील सुनावणीला व्यक्त केले होते. 

मुंबई पालिकेतल्या १३२ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू, वाचा सविस्तर

समोपचाराने तोडगा काढावा 
मृत कोरोना योद्धाच्या अन्य मालमत्तेबाबतीतही संबंधितांनी कोर्ट कचेरी करण्यापेक्षा सामोपचाराने तोडगा काढावा, असेही खंडपीठाने सुचविले आहे. पक्षकारांच्या वकिलांनीही याला अनुमोदन दिले आहे. सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आठवडाभराची मुदत न्यायालयाने पक्षकारांना दिली आहे. याचिकेवर पुढील सुनावणी 11 सप्टेंबरला होणार आहे.  

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Share in the financial compensation of the second wifes inheritance; Significant High Court Judgment